*चाकण प्रतिनिधी
दिनांक - ६ फेब्रुवारी २०२६ -खालुंब्रे : एच.पी. चौक ते खालुंब्रे या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, मुरूम व साचलेले पाणी असल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
आज संध्याकाळी अनेक दुचाकी घसरून अपघात झाले. आशिष कड राहणार थेरगाव या दुचाकीस्वार कामगाराची दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात संबंधित कामगार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. विशेषतः पावसाळ्यात हा रस्ता अधिकच धोकादायक बनत असून लहान-मोठे अपघात नेहमीचे झाले आहेत.
या मार्गावरून दररोज कामगार, शालेय विद्यार्थी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





Social Plugin