Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

 

बंजारा समाजाच्या कायम पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पोहरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे     

राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस

दिग्रस : संत सेवालाल महाराज यांनी समाजाला स्वाभिमान, सदाचार आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजच्या काळात अधिक प्रेरणादायी आहेत. पोहरादेवी हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. पोहरादेवी परिसराचा नियोजनबद्ध विकास करताना श्रद्धेचा सन्मान राखून सुविधा अधिक सक्षम करण्यात येईल. बंजारा समाजाच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.पोहरादेवी ( जि. वाशीम) येथे आज शनिवारी आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात दृरदृश्यप्रणालीव्दारे संदेश देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पर्यटन विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसतो, तर तो स्थानिक संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे संवर्धन करणारा असतो. पोहरादेवी येथे महायुती सरकारच्या काळात झालेला हा शाश्वत विकास आहे, असे मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले. 

यावेळी महोत्सवाचे उद्घाटन करताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, संत सेवालाल महाराज यांचे विचार समाजात समता, बंधुता आणि सेवाभाव रुजवणारे आहेत. पोहरादेवी हे केवळ धार्मिक स्थळ नसून, पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी क्षमता असलेले केंद्र आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आवश्यक त्या पायाभूत सुविधा, रस्ते, निवास व पर्यटक सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले. संत सेवालाल महाराज यांचा वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.पोहरादेवी सारख्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला, तर स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शासन विकास आणि सामाजिक समरसतेसाठी कटिबद्ध आहे. पोहरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार धर्मगुरू बाबुसिंग महाराज, आमदार किरण सरनाईक, आ.सई डाहाके, आ.राजेश राठोड , आ.किसन वानखडे, पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनी नाईक,  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविक भाषणात पर्यटन महोत्सवाची रूपरेषा विषद केली. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. संत सेवालाल महाराज यांच्या विचारांवर समाज चालत आहे. संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्यात येते, असे ते म्हणाले. विकासकामांची माहिती देताना शासनाचे भक्कम पाठबळ पोहरादेवी विकासासाठी मिळत आहे. बंजारा काशीची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल होत आहे, असे ते म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने श्री संत सेवालाल महाराज यांचे नाव दिल्याबाबत शासनाचे आभार व्यक्त केले.यावेळी महंत जितेंद्र महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना संत सेवालाल महाराज यांनी शांतीचा संदेश दिला, असे सांगून लोकप्रतिनिधींनी बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी, संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवामुळे पोहरादेवीचा नावलौकिक वाढत आहे. अशा उपक्रमांतून युवा पिढीला संस्कृतीची ओळख होते, असे सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ या भागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील. पर्यटन राज्यमंत्री म्हणून पोहरादेवी विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सेवारत्न पुरस्कारांचे वितरण

महोत्सवाच्या निमित्ताने समाजसेवा, सांस्कृतिक कार्य आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात मान्यवरांना सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या भव्य आयोजनामुळे पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव राज्यपातळीवर विशेष लक्षवेधी ठरला असून, भविष्यात या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या महोत्सवामुळे श्रद्धा, संस्कृती आणि पर्यटन विकास यांचा प्रभावी संगम घडून येत असल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाला विविध मान्यवर महंत, विश्वस्त, ट्रस्टी, देशभरातून आलेले हजारो समाजबांधव नागरिक उपस्थित होते.