Ticker

6/recent/ticker-posts

राजकारणाची ऐशी तशी जिकडे तिकडे पैशाच्या राशी






   बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काही गटात अतिशय तुल्यबळ अशी निवडणूक होत आहे. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील एकंबे जिल्हा परिषद गटाची चर्चा गेली अनेक दिवस जिल्ह्याच्या राजकारणात होत आहे. एकंबे जिल्हा परिषद गटात एकंबे गण( कोरेगाव विधानसभा मतदारसंघ) व साप गण( कराड उत्तर मतदारसंघ) अशा दोन गणात विभागला गेला गेला असून येथून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सौ राजेश्वरी दयानंद भोसले व शिवसेनेकडून सौ सुनिता जवाहरलाल भोसले असे एकसळ गावच्या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

*धनिकांची निवडणूक*

 स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक असे याकडे पाहिले जाते. परंतु गेल्या काही महिन्यातील विद्यमान दोन्ही उमेदवारांचा झालेला खर्च पाहता या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले श्री शहाजी क्षीरसागर, विजयसिंह शिंदे  व श्रीकांत चव्हाण अशा जनमत असलेल्या व्यक्तींनी या निवडणुकीतून माघार घेतली. परंतु यामुळे या मतदारसंघातील मतदारांची खूपच चंगळ झालेली दिसून येत आहे. गणपतीपुळे, सयाजी वॉटर पार्क अकलूज व कोल्हापूर दर्शन अशा सहलीचे नियोजन गेल्या काही महिन्यात दिसून आले आहे. निवडणूक थोडी लवकर लागली नाहीतर अयोध्या व काशी अशी सहल होणार होती असे चर्चिले गेले आहे. पण यामुळे गेली किती वर्ष पक्षाची ध्येय धोरणे अंगीकारलेले कार्यकर्तेच्या पदरी निराशा पडली आहे. कारण कोटीच्या कोटी खर्च करण्याचे ऐपत सामान्य कार्यकर्त्यापाशी नसते त्यामुळे ही निवडणूक धनिकांची झाली आहे असेच म्हणावे लागेल.

 *जिहे-कटापुरचे पाणी?*

     दुष्काळी भागासाठी असलेल्या जिहे- कटापूर योजनेचे पाणी रामोशीवाडी(ता. कोरेगांव) येथून बंदिस्त पाईपलाईन द्वारे नेर तलावात सोडण्यात येत आहे.सेकंडरी सिंचनासाठी रामोशीवाडी येथे एक ‌‘टी‌’ (चेंबर) देऊन पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. रामोशीवाडीपासून निघणारा उजवा कॅनॉल भाटमवाडी, शेल्टी, खिरखिंडी, एकंबेचा काही भाग, वाघजाईवाडी, जायगाव, अपशिंगे, अंभेरीपर्यंत जाणार आहे. या दुष्काळी भागाचा प्रश्न सन 2017 रोजी मांडण्यात आला. यामध्ये गणेश यादव कन्हेरखेड, अरविंद कदम साप,अविराज जगदाळे वेळू व धनाजी कदम अंभेरी यांचा सक्रिय सहभाग होता. यांच्या प्रस्तावाला तत्कालीन जलसंपदा मंत्री श्री विजय शिवतरे यांनी अंशतः मान्यता दिली होती,हे कित्येकांना माहित सुद्धा नाही. आता हे पाणी किती दिवसांनी या दुष्काळी भागाला भेटेल हे आत्ताच कोणी सांगत नाही परंतु नेहमीप्रमाणे पाणी येणार आणि दुष्काळ हटणार या आशेवर या ठिकाणचा मतदार किती दिवस झुलत राहील हे राम जाणे!!!

 *साप गणात तिरंगी लढत* 

साप गणात राष्ट्रवादीकडून श्री अजिंक्य कदम तर शिवसेनेकडून भगवान कदम हे निवडणूक लढवत आहेत. येथून श्री किरण जाधव अपक्ष म्हणून रिंगणात उभे आहेत. या गणात निवडणुकीचा निकाल अतिशय कमी मतात लागेल अशी शक्यता असली तरी तिन्ही उमेदवार आपल्या परीने जोरदारपणे प्रचार करत आहे.

 *एकंबे गण*

 येथून शिवसेनेतर्फे शिर‌ंबे येथील अँड. श्री नितीन भोसले आपले नशीब आजमावत आहेत. ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. त्यांच्याविरोधात एकंबे येथील श्री केतन चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. श्री चव्हाण यांनी गेल्या काही दिवसात युवकांचे मोठे संघटन निर्माण केले असल्यामुळे येथील निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे असे दिसून येत आहे.

   काही दिवसांपूर्वी आपण प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले. भारतीय लोकशाहीला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लोकशाही परिपक्व झाली असे आपण म्हणत असो तरी लोकशाहीचा मूळ गाभा असलेला मतदार आज परिपक्व झालाच आहे असे म्हणणे धोक्याचे ठरेल. कारण लोकशाहीत मतदान सारखे पवित्र कार्य करणारे मतदार जर स्वतःच्या मताची बोली लावत असतील तर या अमृत महोत्सवी वर्षात हा लोकशाहीचा पराभवच म्हणावा, असे खेदाने नमूद करावे लागेल.