Ticker

6/recent/ticker-posts

मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा.



नाशिक,प्रतिनिधी,अमन शेख,

मुलगी झाल्याच्या कारणावरून एका विवाहितेला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिवे मारण्याच्या धमक्या देत माहेरकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचे माहेर मुंबईनाका परिसरात असून तिचा विवाह नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता. १२ नोव्हेंबर २०२२ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत ती धुळे तसेच मुंबईतील गोरेगाव येथे सासरी राहत होती. या काळात तिला मुलगी झाल्यानंतर पतीसह सासरच्या नातेवाईकांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, मुलगी जन्माला आल्याने नाराजी व्यक्त करत संबंधितांनी विवाहितेला मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच लग्नावेळी वडिलांनी दिलेले सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने, ३ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि अन्य संसारोपयोगी साहित्य स्वतःकडे ठेवून त्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. याशिवाय माहेरहून आणखी १० लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

 प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाणे येथे पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.