आयटीआय बिलोली व डाएट नांदेड तज्ज्ञांचे मार्गदर्शन - “गुणांपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची” विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश
बिलोली प्रतिनिधी - आमेटवार राजेश
बिलोली - तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल लोहगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विविध शैक्षणिक-सांस्कृतिक स्पर्धांचे पारितोषिक वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षण व करिअर वाटचालीस दिशा देणारा हा कार्यक्रम तीन सत्रांत आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक शिक्षक बालाजी गेंदेवाड यांनी केले. प्रथम सत्रात पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. सत्राच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव कोंडावार होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर काचमोडे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार डॉ. दिलीपराव शिंदे आणि ज्येष्ठ सदस्य हणमंतराव नाईनवाड उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
द्वितीय सत्रात दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधी व कौशल्याधारित अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी "श्रीधर स्वामी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिलोली" यांच्या तज्ज्ञ टीमने मार्गदर्शन केले. स्वाती हुलसुरे (शिल्पनिदेशक – फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी), श्रावणी संगमवार (ड्रेस मेकिंग), ज्योतिबा नवारे (पेंटर जनरल), आशिष सोनकांबळे (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) यांनी विविध ट्रेड, आयटीआय अभ्यासक्रम, रोजगाराभिमुख कौशल्ये व स्वावलंबनाच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी कर्मचारी आकाश राखे हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
तृतीय सत्रात डाएट कॉलेज नांदेडच्या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन व व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन केले. अधिव्याख्याता प्रकाश शिरसे यांनी शाळेतील संस्कारमूल्ये व शिक्षकांची जिव्हाळ्याची भूमिका अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ अधिव्याख्याता मंजुषा औढेकर यांनी दहावीच्या परीक्षेकडे आत्मविश्वासाने पाहण्याचा, स्वतःच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्याचा आणि निर्णय विचारपूर्वक घेण्याचा सल्ला दिला.
अधिव्याख्याता डॉ. किरण रापतवार यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना “गुणांपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची आहे, वेळेचे नियोजन करा, ताणतणाव टाळा, वाचनाची सवय लावा आणि मोबाईलचा सजग वापर करा,” असा संदेश दिला. यावेळी तळणी येथे कार्यरत असलेले प्राथमिक पदवीधर शिक्षक रमाकांत तुंबरफळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
गावातील शिक्षण प्रेमी नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमुख अतिथी डॉ. दिलीपराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, स्वयंशिस्त, चांगल्या सवयी व संवादकौशल्य यांचे महत्त्व पटवून दिले. आवडीनुसार करिअरची निवड करा आणि प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ शिक्षक सूर्यकांत गेटकेवार यांनी शिक्षकांच्या कडक शब्दांमागील आपुलकी स्पष्ट करून “शाळा हे संस्काराचे केंद्र आहे,” असे नमूद केले.
कार्यक्रमात सूत्रसंचलन श्रुती नाईनवाड, प्रतीक्षा काचमोडे व माहेश्वरी राजूरे यांनी प्रभावीपणे केले. स्वागतगीत माहेश्वरी राजूरे, श्रुती नाईनवाड व प्रणवी गायकवाड यांनी सादर केले. दहावीच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली. शाळेने विद्यार्थ्यांवर केलेल्या संस्कारांचे फलक सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी निरोप मूर्तीं असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला डिजिटल बोर्डची भेट देण्यात आली. तसेच यावेळी शाळेचे अंशकालीन सेवक नारायण मामा काचमोडे यांना मुख्याध्यापक शिवाजीराव कोंडावार यांच्या वतीने आहेर भेट देण्यात आले व इयत्ता एक ते चार पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर दिलीपराव शिंदे यांच्या वतीने डिजिटल टॅब भेट देण्यात आले.
तिन्ही सत्रांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिवाजीराव कोंडावार यांनी समारोपपर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी सविस्तर असे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन लक्ष्मणराव मुंडकर यांनी केले.
यावेळी उपस्थित सर्वांसाठी उत्तम अशी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बालाजीराव बुढ्ढे, पोतन्ना रयतुवार, उज्वलाताई बेंद्रे, मीनाताई चिंतावार, वैजनाथ होटकर, बालाजी निलमवार, वर्षाताई गुंडावार, धम्मदीप भुताळे, रमेश कारकून तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





Social Plugin