Ticker

6/recent/ticker-posts

दौंड हादरले! महामार्गावर खुनी थरार; जुन्या वैमनस्यातून आरोपीचा 'गेम' केल्याची चर्चा.


गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी

दौंड:पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ येथे शुक्रवारी रात्री एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत व्यक्ती पाटस भागातील एका दुहेरी खून प्रकरणातील आरोपी असल्याचे समजते. ही घटना अपघात असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असला तरी, घटनास्थळाची भीषणता पाहता हा पूर्वनियोजित कट असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

​नेमका काय आहे प्रकार?

​मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीची हत्या झाली आहे, ती व्यक्ती आधीच एका मोठ्या गुन्हेगारी प्रकरणात आरोपी होती. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी त्याला गाठून त्याचा काटा काढला. महामार्गाच्या कडेला असलेल्या बॅरिकेड्सवर उडालेले रक्ताचे शिंतोडे आणि मृतदेहाची अवस्था पाहता, त्याच्यावर धारदार शस्त्राने किंवा जड वस्तूने वार करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

​अपघाताचा बनाव फसला?

​घटनेनंतर घटनास्थळी मृतदेहा शेजारीच त्याची दुचाकी (KTM) पडलेली होती. सुरुवातीला हा अपघाताचा प्रकार वाटावा असा प्रयत्न झाल्याचे दिसले, परंतु स्थानिक पातळीवर असलेल्या वैमनस्याची पार्श्वभूमी पाहता हा 'खुनाचा बदला खुनाने' असा प्रकार असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

​पोलीस प्रशासनासमोर आव्हान

​दौंड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. भररस्त्यात महामार्गावर झालेली ही हत्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. दौंड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरवली आहेत.