(वाशिम प्रतिनिधी:ओंकार पुरी)
प्रशासकीय दिरंगाईमुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण; 'होळी'पूर्वी देयके निकाली न निघाल्यास तीव्र संघर्षाची तयारी
वाशिम:
जिल्ह्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी यंदाचे आर्थिक वर्ष संघर्षाचे ठरताना दिसत आहे. विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या सुमारे दीड हजारांहून अधिक देयकांना वर्षभरापासून मंजुरी मिळालेली नाही. मार्च महिना संपत आला असतानाही ही देयके प्रशासकीय स्तरावर रखडल्याने जिल्ह्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
तांत्रिक त्रुटींच्या नावाखाली अडवणूक?
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये वैद्यकीय देयके, वरिष्ठ व निवड श्रेणीची देयके, वेतन आयोगाचा फरक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रक्कमेचा समावेश आहे. अनेकदा ही देयके सादर करूनही त्यावर तांत्रिक आक्षेप आणि किरकोळ त्रुटी दाखवून ती प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही फायली पुढे सरकत नसल्याने शिक्षकांना नाहक मानसिक आणि आर्थिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्रिस्तरीय प्रक्रियेत 'शिक्षणाधिकारी' स्तरावर खोळंबा
नियमानुसार शिक्षकांची देयके मुख्याध्यापक (DDO 1), वेतन पथक अधीक्षक (DDO 2) आणि शेवटी शिक्षणाधिकारी (DDO 3) अशा तीन स्तरांतून मंजूर केली जातात. सध्याची परिस्थिती पाहता, बहुतांश देयके ही शिक्षणाधिकारी स्तरावरच प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. २०२४-२५ मध्ये निधीअभावी नाकारलेली देयके पुन्हा सादर करण्याचे आदेश देऊनही अद्याप ती निकाली काढण्यात आलेली नाहीत.
प्रशासनाचा दावा आणि संघटनांचा इशारा
दुसरीकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे (गायकवाड) यांनी मात्र त्यांच्या स्तरावर कोणतीही देयके थकीत नसल्याचा दावा केला आहे. ज्यांची देयके रखडली आहेत त्यांनी थेट कार्यालयात येऊन चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, जर मार्च अखेरपूर्वी ही थकीत देयके मंजूर झाली नाहीत, तर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने तीव्र जिल्हास्तरीय आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आता देण्यात आला आहे.





Social Plugin