प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर : शहर व तहसील परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दारू, वरळी मटका व जुगार यांसारख्या अवैध व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरासह ग्रामीण भागात हे धंदे उघडपणे सुरू असल्याची चर्चा सर्वत्र आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावठी दारू व देशी दारूची विक्री काही भागांत खुलेआम होत असून काही ठिकाणी छुप्या पद्धतीने व्यवहार सुरू आहेत. तहसील व पंचायत समिती परिसर, शेतकरी सोसायटीजवळ तसेच काही सार्वजनिक ठिकाणी मटका बुकी सक्रिय असल्याचे नागरिक सांगतात. परिणामी तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असून सामाजिक वातावरण बिघडत चालल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
तहसीलमध्ये लोणी, मंगरूळ चवळा आणि नांदगाव खंडेश्वर अशी प्रमुख पोलिस ठाणे कार्यरत आहेत. प्रत्येक ठाण्यात अधिकारी व कर्मचारी असतानाही मोठी कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींच्या दबावामुळे पोलिस यंत्रणा ठोस पावले उचलत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. तथापि, या आरोपांबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नाही.
अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागण्याची भीती व्यक्त होत आहे. दारू व जुगाराच्या आहारी गेलेल्या तरुणांमुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे सामाजिक संघटना व नागरिक प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी करत आहेत.
दरम्यान, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी पुढे येत आहे. प्रशासनाने ठोस भूमिका घेतल्यास जिल्हा अवैध धंद्यांपासून मुक्त होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
आता प्रशासन या वाढत्या समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि पुढील काळात कोणती पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





Social Plugin