Ticker

6/recent/ticker-posts

चिखली व वाशिम येथे अतिरिक्त परीक्षा संकलन केंद्र स्थापन करावे- प्रा. डॉ. प्रशांत विघे.



रिसोड प्रतिनिधी :  विजय गायकवाड

रिसोड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत परीक्षा व्यवस्थापन व नियोजन अधिक कार्यक्षम, सुरक्षित व विद्यार्थीकेंद्रित करण्याच्या दृष्टीने परीक्षा संकलन केंद्रांची पुनर्रचना करावी अशी मागणी नुटा संघटनेचे सिनेट सदस्य डॉ. प्रशांत विघे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संबंधित विषयासंदर्भात ठोस मागणी अमरावती विद्यापीठाकडे सादर केली आहे. यासंदर्भात मा.परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांच्या कुलगुरूंमार्फत सविस्तर निवेदन सादर केले. सध्या बुलढाणा जिल्ह्यासाठी खामगाव येथे परीक्षा संकलन केंद्र कार्यरत आहे. मात्र जिल्ह्याच्या भौगोलिक विस्तारामुळे अनेक महाविद्यालयांना उत्तरपत्रिका सादर करण्यासाठी ८० ते १०० किलोमीटरपर्यंत प्रवास करावा लागत आहे. त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यासाठी कारंजा येथे केंद्र असून रिसोडसह काही भागांतील महाविद्यालयांना सुमारे ९० ते १०० किलोमीटर अंतर पार करावे लागते.

डॉ.प्रशांत विघे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक  विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि वेळेत पार पाडणे ही विद्यापीठाची कायदेशीर जबाबदारी आहे. उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीदरम्यान होणारा विलंब किंवा संभाव्य धोके परीक्षा प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवर परिणाम करू शकतात. प्रशासन सुलभता व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार सर्व संलग्न महाविद्यालयांना समान व वाजवी सुविधा देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक दृष्टीने दीर्घ अंतरामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांवर अनावश्यक आर्थिक व मानसिक ताण पडतो. परीक्षा कालावधीत वेळेचे बंधन महत्त्वाचे असल्याने दूरच्या प्रवासामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होतात. उत्तरपत्रिकांची सुरक्षित व अखंड साखळी राखण्यासाठी जवळचे संकलन केंद्र उपयुक्त ठरते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तेव्हा बुलढाणा जिल्ह्यासाठी विद्यमान खामगाव केंद्रासोबत चिखली येथे अतिरिक्त परीक्षा संकलन केंद्र स्थापन करण्यात यावे, तसेच वाशिम जिल्ह्यासाठी कारंजा केंद्रासोबत वाशिम येथे स्वतंत्र केंद्र मंजूर करण्यात यावे, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, संचालक डॉ. नितीन कोळी यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका दर्शवित लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने या मागणीचा तातडीने विचार होण्याची अपेक्षा डॉ.प्रशांत विघे यांनी व्यक्त केली आहे. तसेच नुटा संघटनेचे सदस्य डॉ. प्रशांत ठाकरे,डॉ.दीपक राऊत, डॉ.सागर नारखेडे,मयूर देवहाते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या संबंधित विषयासंदर्भात ठोस मागणी सादर केली आहे.