Ticker

6/recent/ticker-posts

सातारची हरित चळवळ आशेचा ‘किरण’








‘माझी वसुंधरा’ अभियानात लोकचळवळ आणि प्रशासनाचे क्रांतिकारक काम

बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळातील केवळ धोरणात्मक गरज नाही, तर अस्तित्वाची अपरिहार्यता आहे. हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील घट आणि वाढती उष्णता यांसारख्या संकटांनी ग्रामीण तसेच शहरी भागाला वेढले आहे. अशा वेळी सातारा जिल्हा परिषदने सर्व ग्रामपंचायतींना बरोबर घेऊन उभारलेली हरित चळवळ आशेचा ‘किरण’ ठरते आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये जिल्ह्यातील ३ ग्रा.पं. नी पुणे विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावले याचे सर्वश्रेय ग्रा.पं.,  लोकसहभाग, प्रशासकीय दूरदृष्टी आणि शाश्‍वत विकासाच्या बांधिलकीची साक्ष देत आहे.

माझी वसुंधरा अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2020 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी झाली, यामागील प्रतिकात्मकता महत्त्वाची आहे. स्वच्छता, शाश्‍वतता आणि ग्रामस्वराज्याचा विचार पुढे नेणार्‍या गांधीवादी तत्त्वांशी या अभियानाची सांगड घातली गेली. मात्र, केवळ घोषणांवर किंवा कागदोपत्री उपक्रमांवर मर्यादित न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरूप देणे हेच खरे आव्हान होते. सातारा जिल्हा परिषदेने हे आव्हान स्वीकारले आणि त्याला जिल्ह्यातील सर्व  ग्रामपंचायतींनी यशस्वी प्रतिसाद दिला.

या यशामागे सातारा जिल्हा परिषद सीईओ याशनी नागराजन व ग्रा.पं.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांचे नेतृत्व निर्णायक ठरले. प्रशासनातील अधिकारी म्हणून केवळ आदेश देण्यापेक्षा गावोगावी जाऊन प्रत्यक्ष संवाद साधण्याची त्यांची कार्यपद्धती उल्लेखनीय आहे. ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक, शेतकरी, महिला बचतगट आणि स्वयंसेवी संस्थांशी थेट चर्चा करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडला. हीच खरी लोकाभिमुखता.

जिल्हयात माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत 1489 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. ती आकडेवारी प्रभावी असली, तरी त्यामागील प्रक्रिया अधिक महत्त्वाची आहे. वृक्षलागवड, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता उपक्रम आणि हरित पट्टे वाढविणे या कृतींमधून पंचतत्त्वांच्या संतुलनाचा विचार पुढे आला. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या नैसर्गिक घटकांचे रक्षण केल्याशिवाय ग्रामीण जीवनमान उंचावू शकत नाही, ही जाणीव ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली. परिणामी, पर्यावरण हा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता सामाजिक जबाबदारी ठरला.

सातार्‍याच्या अनुभवातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे लोकचळवळ आणि तंत्रज्ञानाचा वापर. डिजिटल नोंदणी, छायाचित्र पुरावे, नियमित अहवाल सादरीकरण आणि संगणकीकृत प्रणाली यांमुळे उपक्रमांची विश्‍वासार्हता वाढली. पर्यावरणीय कामांमध्ये अनेकदा केवळ कागदोपत्री यश दाखवले जाते, अशी टीका होते. मात्र, सातार्‍याने प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देत या टीकेला उत्तर दिले. पारदर्शक व्यवस्थापनामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्‍वास दृढ झाला.

या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा व्यापक सामाजिक परिणाम. वृक्षलागवडीमुळे हरित पट्टे वाढले, जलस्रोतांचे पुनर्भरण झाले आणि स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढली. वीज बचतीसाठी सौरऊर्जा प्रमाण वाढले आहे. पर्यावरणीय संतुलन सुधारल्यास शेती उत्पादन, आरोग्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांनाही बळ मिळाले आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ पर्यावरणपुरता मर्यादित न राहता सर्वांगीण विकासाचा मार्ग ठरतो.

आज अनेक योजना आणि अभियानांची घोषणा होते; परंतु त्यांची परिणामकारकता लोकसहभागावर तसेच प्रशासनाच्या सहकार्यावर अवलंबून असते. सातारा जिल्हा परिषदने दाखवून दिले की प्रशासनाने केवळ सूचना देत नाही; लोकांशी थेट संवाद, त्यांचा सहभाग आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे सीईओ याशनी मॅडम  फिल्डवर काम करताना दिसतात. प्रशासकीय नेतृत्व जर प्रेरणादायी आणि सर्वांना बरोबर घेऊन सातत्यपूर्ण काम करीत असतील, तर सरकारी उपक्रमही लोकांची चळवळ बनू शकते. हे सातारकरांनी वेळोवेळी सिध्द करुन दाखविले आहे.

निश्‍चितच, पुरस्कार आणि क्रमांक हे यशाचे प्रतीक आहेत; परंतु खरी कसोटी पुढील काळात लागणार आहे. लावलेली झाडे टिकवणे, जलसंधारणाच्या रचना कार्यक्षम ठेवणे आणि स्वच्छतेची सवय कायम राखणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. सातार्‍याने पहिली पायरी यशस्वीरीत्या पार केली आहे; आता सातत्य राखणे ही पुढील जबाबदारी आहे.

सातारा जिल्ह्यात गतवर्षीपासून हरितक्रांती उदयास येत आहे. पर्यावरण संवर्धनाला केवळ प्रशासकीय चौकटीत न ठेवता लोकांच्या जीवनशैलीचा भाग बनविण्यात प्रशासनाला यश आले आहे. सातार्‍याने हे साध्य करून दाखवले आहे. सीईओ याशनी नागराजन यांच्या सारखे योग्य नेतृत्व, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि व्यापक लोकसहभाग यांच्या साहाय्याने शाश्‍वत विकासाचा आदर्श उभा करता येतो, याची साक्ष सातार्‍याने दिली आहे. आज गरज आहे ती या हरित क्रांती पॅटर्नची प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात. कारण हरित भविष्य ही केवळ संकल्पना नाही; ती सामूहिक कृतीतून साकार होणारी वास्तवता आहे. सातार्‍याची झेप ही त्या वास्तवतेकडे टाकलेले ठोस पाऊल आहे.


वरुड ग्रामपंचायतीसाठी गौरवशाली क्षण! 

वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पुणे विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावत वरुड ग्रामपंचायतीने ५० लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. पर्यावरण संवर्धन, हरितक्रांती आणि लोकसहभागातून साधलेले हे यश संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरले आहे. वरून मध्ये ग्रामविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ राबवत असते. शासनाच्या अनेक पुरस्कारा वरुड गावाने प्राप्त केले आहेत. वरुडच्या गौरवशाली परंपरेमध्ये वसुंधराचा तुरा रोवला गेला आहे. 

झाडांचे एखाद्या लेकराप्रमाणे जतन : चैतन्य जोशी 

वरुड येथील ग्रामस्थ लोकसहभाग, जिल्हा परिषद प्रशासन आणि से ट्रीज सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त प्रयत्नांतून गेल्या सात वर्षांपासून सुमारे २५ ते २६ हजार वृक्ष व फळबागांची लागवड करण्यात आली आहे. वरूडकरांनी या प्रत्येक झाडाचे एखाद्या लेकराप्रमाणे जतन केले आहे, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. या उपक्रमात सरपंच सुमन वाघमारे, उपसरपंच सदाशिव माने, ग्रामसेवक अपूर्वा चव्हाण तसेच नरेंद्र जगदाळे यांनी विशेष पुढाकार घेतला असून सर्व ग्रामस्थांनी त्यांना उत्स्फूर्त सहकार्य केले आहे. वरुडमध्ये झालेली हरितक्रांती आणि वरूड सरोवर यामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळाली असून पर्यटनवाढीच्या दृष्टीनेही सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत.