Ticker

6/recent/ticker-posts

डी. जी. महाविद्यालयात केंद्रीय बजेट २०२६–२७ वर चर्चा



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात केंद्रीय युनियन बजेट २०२६–२७ या विषयावर भव्य पॅनल डिस्कशन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या सन २०२६–२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या अर्थसंकल्पाचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांवर — करप्रणाली, कृषी, शिक्षण, सामाजिक सुरक्षा, रोजगारनिर्मिती तसेच वित्तीय व भांडवली बाजारांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यासपूर्ण आढावा विद्यार्थ्यांना घेता यावा, या उद्देशाने महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते.

या चर्चासत्रामध्ये सीए विठ्ठल जाधव, कृषी अधिकारी अंकुश सोनावले, अर्थशास्त्राचे अभ्यासक व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार तसेच मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता व अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. अनिलकुमार वावरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सीए श्री. विठ्ठल जाधव यांनी अर्थसंकल्पातील विविध संकल्पना स्पष्ट करत कररचना, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, वित्तीय शिस्त तसेच भांडवली गुंतवणूक यावर होणाऱ्या परिणामांचे सविस्तर विवेचन केले. त्यांनी बजेटमधील धोरणात्मक निर्णय भारताच्या दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी कसे महत्त्वाचे ठरणार आहेत, यावर प्रकाश टाकला. कृषी अधिकारी श्री. अंकुश सोनावले यांनी बजेटमधील कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी असलेली धोरणे तसेच कृषी विकास योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली.

प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी शिक्षण क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा सखोल आढावा घेत मानव संसाधन विकास, कौशल्याधारित शिक्षण, संशोधन व रोजगारनिर्मितीमध्ये अर्थसंकल्पाची भूमिका स्पष्ट केली. तर प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे यांनी सामाजिक सुरक्षा, सर्वसमावेशक विकास तसेच मागील दीड दशकातील विविध केंद्रीय बजेटमधून सरकारने राबविलेल्या धोरणांचा तुलनात्मक आढावा मांडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हसके हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी अशा चर्चासत्रांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक धोरणे समजून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

सदर चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ. राजशेखर निलोलू यांनी केले. सूत्रसंचालन निकिता जाधव व रोहिणी ढाने यांनी केले. श्रीकांत गंगावणे व विभागातील इतर शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. विजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या चर्चासत्राला मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.