बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी केले. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात अग्रणी कॉलेज अंतर्गत आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले,के.के. घाटगे,प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.जाधव पुढे म्हणाले की,' कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म मशीन लर्निंगच्या माध्यमातून झाला आहे. माणूस जसा विचार करतो, शिकतो,अनुभवातून निर्णय घेतो, त्याच पद्धतीने मशीन तयार केली जात आहे.माणसाला दिसणे, पाहणे, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, बोलणे आणि विचार करण्याची क्षमता असते; त्याच क्षमतांचे अनुकरण संगणक व मशीनमध्ये केले जात आहे.ए.आय.तंत्रज्ञानाचा वापर आज आरोग्य, वैद्यकीय सेवा, कायदा,आर्थिक व्यवहार, वाणिज्य, वाहतूक, शिक्षण, ग्राहक सेवा अशा विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वैद्यकीय क्षेत्रात निदान, शस्त्रक्रिया, उपचार नियोजन, तर शिक्षण क्षेत्रात वैयक्तिक अध्ययन पद्धती विकसित करण्यासाठी ए.आय.उपयुक्त ठरत आहे. तसेच अंतरविद्याशास्त्रीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, ए.आय.मुळे अनेक नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ एका विषयापुरते मर्यादित न राहता तंत्रज्ञान, विज्ञान, वाणिज्य आणि सामाजिक शास्त्र ,कृषी आदी क्षेत्रांचा समन्वय साधावा.ग्रामीण विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, ए.आय. तंत्रज्ञान हे संधीचे दार आहे; योग्य प्रशिक्षण, कौशल्य आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात.
या मार्गदर्शनपर भाषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये ए.आय.विषयी जागरूकता निर्माण झाली असून तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली आहे. अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, के. के.घाटगे यांनी तंत्रज्ञानाच्या वेगाने होत असलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना सांगितले की, चॅटजीपीटी सारखी संकणकीय साधने आणि विविध तंत्रज्ञानावर आधारित टूल्स मुळे मानवी इतिहासात एक मोठी क्रांति ठरत आहे. संगणकाला दिलेल्या अज्ञानुसार कार्य करणारी यंत्रणा नवनवीन शोध व निर्मितीस चालना देत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा.डॉ संजय क्षीरसागर यांनी केला. सुत्रसंचलन प्रा.एम. एन. आवळे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. एम. एस. वाघ यांनी मानले .कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin