वार्ताहर:लकी राठोड
मांडवी: येथील बळीराम रुग्णालयाची अवस्था सध्या 'असून अडचण आणि नसून खोळंबा' अशी झाली आहे. परिसरातील तब्बल ५२ गावांतील गोरगरीब जनता या रुग्णालयावर अवलंबून आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना साध्या गोळ्या देऊन घरी पाठवले जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. मात्र, फार्मसीमध्ये गेल्यावर औषधे उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळते.
रुग्णांना केवळ काही जुजबी गोळ्या (उदा. पॅरासिटामॉल) देऊन बोळवण केली जात आहे. गंभीर आजारांसाठी लागणारी महत्त्वाची औषधे आणि इंजेक्शन नसल्यामुळे रुग्णांना खाजगी मेडिकलमधून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहेत.५२ गावांचा भार असलेल्या या रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने गरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. "आमच्याकडे खाजगी दवाखान्यात जायला पैसे नाहीत म्हणून आम्ही इथे येतो, पण इथे औषधच मिळत नसेल तर आम्ही जायचे कुठे?" असा सवाल त्रस्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. केवळ गोळ्या देऊन रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थ करत आहेत.





Social Plugin