कळमेश्वर : सतीश पांडे (प्रतिनिधी)
रक्ताची नाती दुरावली तरी माणुसकी अजून जिवंत आहे, याचा प्रत्यय आज कळमेश्वर मध्ये आला. ब्राह्मणी बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून निराधार अवस्थेत भटकणाऱ्या ६० वर्षीय सिंधुबाई देविदास सहाने या वृद्ध महिलेला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे आणि त्यांच्या टीमच्या पुढाकाराने हक्काचा निवारा मिळाला आहे. कळमेश्वर पोलीस आणि 'साथ फाउंडेशन' बुटीबोरी यांच्या समन्वयातून या माउलीच्या आयुष्यातील अंधार दूर झाला असून, या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा आणि कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
मूळच्या राजुरा बाजार (ता. वरुड, जि. अमरावती) येथील रहिवासी असलेल्या सिंधुबाई देविदास सहाने (वय ६०) या गेल्या काही दिवसांपासून कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी बस स्थानक परिसरात अत्यंत दयनीय अवस्थेत वावरत होत्या. खाण्यापिण्याची भ्रांत आणि राहण्यासाठी छप्पर नसल्याने या माउलीची अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे आणि त्यांच्या टीमने तात्काळ मदतीचा हात पुढे केला.
पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समन्वय
मंगेश गमे यांनी या घटनेची माहिती कळमेश्वर पोलीस स्टेशनला दिली. महिला पोलीस शिपाई स्नेहा पारसे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून सिंधुबाईंची विचारपूस केली. "माझे या जगात कोणीही नाही, मी कुठेही राहते आणि जे मिळेल ते खाते," असे सांगताना सिंधुबाईंना गहिवरून आले होते. त्यानंतर मंगेश गमे आणि पोलीस प्रशासनाने मिळून त्यांना ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तिथे डॉ. कांचन आकरे यांनी त्यांची तपासणी करून त्या पूर्णपणे स्वस्थ असल्याचे सांगितले.
'साथ' फाउंडेशन बुटीबोरी येथे पुनर्वसन
केवळ रस्त्यावरून उचलून दवाखान्यात नेण्यापुरते मर्यादित न राहता, मंगेश गमे आणि त्यांच्या टीमने सिंधुबाईंच्या कायमस्वरूपी निवाऱ्यासाठी प्रयत्न सुरू केले. बुटीबोरी येथील 'साथ फाउंडेशन' (रजि. नं. महा. २८/२०२०) शी संपर्क साधून त्यांना या संस्थेत दाखल करण्याची विनंती केली. संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक यांनी या वृद्ध माउलीला स्वीकारण्याची तयारी दर्शविली, ज्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न सुटला आहे.
कळमेश्वर मध्ये आनंदाचे वातावरण
एका बेसहारा वृद्ध महिलेला सुरक्षित निवारा मिळाल्याने कळमेश्वर मध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन आणि मंगेश गमे यांच्या टीमने दाखवलेल्या या संवेदनशीलते मुळे "पोलीस आणि जनता" यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले आहे.
"एका वृद्ध माउलीला अशा परिस्थितीत पाहणे वेदनादायी होते. पण पोलीस प्रशासन आणि साथ फाउंडेशनच्या सहकार्याने त्यांना हक्काचे घर मिळवून देऊ शकलो, याचे समाधान मोठे आहे."
— मंगेश गमे, सामाजिक कार्यकर्ते, कळमेश्वर







Social Plugin