Ticker

6/recent/ticker-posts

अमळनेर नगर परिषद कडक भूमिकेत-पाणी वाया घालवणाऱ्यां नागरिकांवर थेट कारवाई!




अमळनेर : शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अमळनेर नगर परिषद प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक नागरिकाला २ ते ३ दिवसांनी पाणी मिळावे यासाठी सध्या नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. नगर परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास आणि पाण्याची बचत केल्यास सध्याचे ३ दिवसांचे अंतर कमी करून २ दिवसांत पाणी देणे शक्य होऊ शकते.महत्त्वाच्या सूचना–प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक नळ त्वरित बंद करा–पाणी भरून झाल्यानंतर नळ उघडा ठेवू नका. अपव्यय टाळा–अंगण धुणे, गाड्या धुणे, रस्त्यावर पाणी वाहू देणे टाळावे. जबाबदारी घ्या–तुमच्या एका चुकीमुळे शेवटच्या घरातील नागरिकांना पाणी मिळत नाही, याची जाणीव ठेवा.

 कडक इशारा: फोटो प्रसिद्ध करून दंडात्मक कारवाई! 

पाणी वाया घालवताना आढळलेल्या नागरिकांचे फोटो प्रशासकीय ग्रुपवर प्रसिद्ध करण्यात येतील आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच ज्यांच्याकडे अधिकृत नळ कनेक्शनची पावती नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. अनधिकृत कनेक्शन घेतलेल्या नागरिकांनी पुढील १५ ते २० दिवसांत ते अधिकृत करून पावती घ्यावी. मुदत संपल्यानंतर आढळलेल्या अनधिकृत कनेक्शनवर प्रशासकीय नियमांनुसार थेट कारवाई केली जाईल. शहरातील सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठा विभागाचे विशाल देवरे यांनीही “पाणी वाचवा, शहर वाचवा” असा स्पष्ट संदेश दिला आहे. एकच मंत्र–पाणी वाचवा, अमळनेर वाचवा!”* कारण प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. अमळनेरकरांची पाणीपुरवठ्यावर ठाम मागणी दिवसभर बारीक नळ सुरू राहण्यामुळे प्रचंड नासाडी; वेळापत्रक जाहीर करण्याची नागरिकांची जोरदार मागणी

नियोजनबद्ध पाणीपुरवठा हीच सध्याच्या परिस्थितीत काळाची गरज असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. आता प्रशासनाने यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अमळनेरकर व्यक्त करत आहेत.