Ticker

6/recent/ticker-posts

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात 'मराठी भाषा गौरव दिन' उत्साहात साजरा.







रिसोड (प्रतिनिधी) : स्थानिक उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने 'मराठी भाषा गौरव दिन' अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी होते.

मायबोलीचा आदर ही काळाची गरज - प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांनी मराठी भाषेच्या समृद्ध आणि गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. "ज्या मायबोलीने आपल्याला घडवले आणि संस्कार दिले, तिचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी केवळ भाषा नसून ती आपली संस्कृती आणि अस्मिता आहे," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एम. पी. खेडेकर यांनी केले. त्यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत, त्यांच्या लेखनामुळे मराठी साहित्याला प्राप्त झालेल्या जागतिक वैभवाची माहिती दिली.

कुसुमाग्रजांच्या साहित्याचे अभ्यासपूर्ण विवेचन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. संदीप जुनघरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कुसुमाग्रजांच्या कवितांचे रसग्रहण केले. विशेषतः 'कणा' या कवितेतील स्वाभिमानी वृत्ती आणि 'नटसम्राट' नाटकातील आप्पा बेलवणकर यांच्या पात्राद्वारे आजच्या समाजातील वृद्धांच्या गंभीर समस्या त्यांनी प्रभावीपणे मांडल्या. मराठी साहित्याचा आधुनिक संदर्भात अर्थ समजून घेणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केले.

विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात काव्यवाचन, कुसुमाग्रज साहित्यावर परिसंवाद आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले.

स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे:

काव्यवाचन स्पर्धा: प्रथम – कैलास जाधव, द्वितीय – मेघा इंगळे, तृतीय – रक्षा शिंदे.

परिसंवाद: प्रथम – ममता लाटे, द्वितीय – अजेश चव्हाण, तृतीय – सलोनी अंभोरे.

निबंध स्पर्धा: प्रथम – पूजा मोरे, द्वितीय – अनिकेत खरात, तृतीय – स्वप्निल चोपडे.

प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. सुमित लाहोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पूजा पाठक यांनी मानले. या प्रसंगी प्रा. टिकार, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा. डॉ. ए. जी. वानखेडे, प्रा. डॉ. बुधवंत, प्रा. डॉ. मेश्राम,डॉ.मनोज नरवाडे, प्रा.सुभाष पांढरे,प्रा.संदीप जुनघरे, प्रा.विनोद राऊत,प्रा. निलेश बाजड, प्रा.राम जुनघरे, प्रा.अमरदीप साबळे, प्रा. बोंडे मॅडम,  प्रा.विठ्ठल वाघ,  प्रा. मनवर, आणि  श्री.ओंकार पुरी यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रमुख श्री.ओंकार पुरी,  प्रा.डॉ. काळे मॅडम, प्रा. प्रजापती, श्री. बिल्लारी, श्रीमती भोसले, श्रीमती नरवाडे, संतोष घुगे व सुनील चराटे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांपैकी अनुराधा सोनुने, कार्तिक गवळी आणि विश्वनाथ लाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सोहळ्याला सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.