प्रशासनाच्या भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष; मुले खेळणार कुठे? पालकांचा संतप्त सवाल
कळमेश्वर (प्रतिनिधी): एकीकडे 'खेळेल तोच वाढेल' अशा घोषणा दिल्या जात असताना, कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद क्षेत्रात मात्र उलटी गंगा वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. लहान मुलांच्या हक्काच्या खेळाच्या मैदानावर चक्क काही बड्या गाडीवाल्यांनी आपला ताबा मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या गाडीवाल्यांनी नगरपरिषद प्रशासनावर दबाव टाकून मैदान पार्किंगसाठी वापरण्याची परवानगी मागितल्याची चर्चा शहरात रंगत आहे. यामुळे "नगरपरिषद मुलांच्या हक्काच्या बाजूने की धनदांडग्या गाडीवाल्यांच्या?" असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
शहरात मुलांसाठी मोकळी मैदाने आधीच कमी आहेत, अशातच जिथे मुले खेळतात तिथे आता अवजड वाहने आणि गाड्या उभ्या करण्याचा घाट घातला जात आहे. जर मैदानावर गाड्यांचे साम्राज्य उभे राहिले, तर मुलांनी खेळावे कुठे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. खेळाच्या मैदानाचे रूपांतर पार्किंगमध्ये करणे म्हणजे मुलांच्या बालपणावर आणि त्यांच्या शारीरिक विकासावर घाला घालण्यासारखेच असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते बिरजूभाऊ रघुवंशी यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, "मैदान हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी असते, गाड्या लावण्यासाठी नाही. जर प्रशासनाने गाडीवाल्यांच्या दबावाखाली निर्णय घेतला आणि मुलांचे मैदान हिरावण्याचा प्रयत्न केला, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही मैदानाचे रूपांतर पार्किंगमध्ये होऊ देणार नाही."
आता नगरपरिषद या दबावाला बळी पडणार की, 'लहान मुलांचे हक्क' जपण्यासाठी या दबावाचा चक्काचूर करणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. काही राजकीय वरदहस्त असलेले गाडीवाले प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणावर मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, यावरच आता या मैदानाचा आणि मुलांच्या भविष्याचा 'खेळ' अवलंबून आहे.





Social Plugin