Ticker

6/recent/ticker-posts

वडिलांच्या स्मृतिदिनी दुर्गम भागात आरोग्य शिबिर.

 


जांबमध्ये समाजाभिमुख संस्काराची जपणूक

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 जांब (ता. खटाव) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य (कै.) मोहन काशिनाथ वायदंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त मुलगा पंकज वायदंडे यांनी दुर्गम भागातील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेऊन बडिलांना अभिवादन केले. या उपक्रमाद्वारे त्यांनी वडिलांच्या समाजाभिमुख संस्काराची जपणूक केली.

पंकज वायदंडे हे कोरेगाव पंचायत समितीमध्ये  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात गेली दहा वर्षे कार्यरत आहे. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, दमा, जुनाट संधिवात, लघवीचे आजार तसेच स्त्रियांचे आजार यांची तपासणी करण्यात आली. ईसीजी, उपाशीपोटी व जेवणानंतरची शुगर, उपाशीपोटी थायरॉईड आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. या रुग्णांना औषधे व इंजेक्शनही मोफत देण्यात आले. शिबिराचा सुमारे ७० ग्रामस्थांनी लाभ घेतला.

या उपक्रमासाठी राघव फाउंडेशनचे सहकार्य लाभले. डॉ. अजित पवार तसेच डॉ. तुषार गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रिया शिंदे यांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना जांब ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. गाजावाजा न करता प्रत्यक्ष कृतीतून वडिलांच्या स्मृतीला अभिवादन केल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.