.jpg)
कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
दिनांक: 15 मार्च 2026
जालना : तालुक्यातील मालीपिंपळगाव येथील तीर्थक्षेत्र श्रीकृष्ण मंदिराच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर १५ ते १९ मार्च दरम्यान ‘संगीतमय श्रीकृष्ण चरित्र कथा’ या भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पाच दिवसीय कार्यक्रमात दररोज रात्री ८ ते १० या वेळेत महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित प.पू. महंत चिंतनीजनक बाभुळगावकर बाबा शास्त्री यांच्या रसाळ वाणीमधून श्रीकृष्ण चरित्राचे निरूपण होणार आहे.
तसेच दररोज सकाळी ८ ते ९ या वेळेत प.पू. महंत श्री दत्तराज बाबा केधपुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद् भगवद्गीता पारायण होणार आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत श्रीक्षेत्र ढाकेफळ येथील महानुभाव मठाच्या मालक संत मालनताई पंजाबी या ‘नामाचे दहा ठाय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या सोहळ्याची सांगता १९ मार्च रोजी महाप्रसादाने करण्यात येणार असून त्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.




Social Plugin