प्रदीप विधाते; भूजलपातळी घटली, येरळा नदीपात्रही झाले कोरडे
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने येरळा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. खटाव तालुक्यातील भूजलपातळी खालावल्यामुळे विहिरींनीही तळ गाठला आहे. पाण्याविना पिके कोमेजून जाऊ लागली आहेत. त्यामुळे पिण्यासाठी आणि सिंचनासाठी नेर धरणातील पाणी नदीपात्रातून त्वरित सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केलीआहे.
अधिक माहिती देताना श्री. विधाते म्हणाले, "गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने, तसेच जिहे कठापूर योजनेच्या सुरू असलेल्या पाण्यामुळे खटाव तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या नेर धरणात अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने येरळा नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या योजना
बंद पडू लागल्या आहेत. भूजलपातळी खालावल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीसारख्या निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना जगणे मुश्कील झाले आहे. उन्हाळी पिकांसह इतर बागायती पिके पाण्याविना कोमेजू लागली आहेत. नेर धरणातील पाणी कॅनॉल आणि येरळा नदीपात्रात सोडले तर सिंचन आणि टंचाईची समस्या दूर होऊन पिकांनाही जीवदान मिळणार आहे."
नेरमधील पाण्यामुळे पुसेगाव, खातगुण, भांडेवाडी, खटाव, कुरोली, भुरकवडी ते कुमठ्यापर्यंतच्या गावांना लाभ होणार आहे. त्यामुळे कृष्णा सिंचन विभागाने त्वरित निर्णय घेऊन नेर धरणातील पाणी सोडावे, अशी मागणी विधाते यांनी केली आहे. पाणी मागणी अर्ज आणि पाणीसारा भरून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.





Social Plugin