Ticker

6/recent/ticker-posts

कळमेश्वरात दि.२४ मार्च पासून श्री संत लहानुजी महाराज जयंती महोत्सव



सतीश पांडे 

कळमेश्वर : येथील श्री संत लहानुजी महाराज मंदिर (लहानुजी वॉर्ड) येथे २४ ते ३१ मार्चपर्यंत परमहंस श्री संत लहानुजी महाराज जयंती महोत्सव व ग्रामजयंती पर्वानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रमात ध्यान, काकडा, अभिषेक, आरती, पारायण, भजन, सामुदायिक प्रार्थना व भाषण, हरिपाठ, आदी कार्यक्रम होणार आहेत.

सप्ताहाची सुरुवात श्रीराम देशमुख यांच्या हस्ते 'श्री'च्या मूर्तीचा अभिषेक करून करण्यात येईल. तीर्थस्थापना दीपक नाथे यांच्या हस्ते होईल. दररोज रात्री ८:३० ते १० वाजेपर्यंत ग्रामगीताचार्य डॉ. सचिन महाराज काळे यांच्या सुश्राव्यवाणीतून श्री संत लहानुजी महाराज संगीतमय चरित्र कथन होईल. २८ व २९ मार्चला भव्य खुली महिला भजन

स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यात विजेत्या मंडळांना १० पुरस्कार तसेच प्रोत्साहनपर वैयक्तिक बक्षिसेसुद्धा देण्यात येणार आहे. ३० मार्चला दुपारी ४ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून श्री संत लहानुजी महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाईल. ३१ रोजी ग्रामगीताचार्य सचिन महाराज काळे यांच्या गोपालकाल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. या सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.