Ticker

6/recent/ticker-posts

कळमेश्वर एमआयडीसी मार्गावरील रेल्वे गेटवर भीषण वाहतूक कोंडी; तात्काळ उपाययोजनांची मागणी



सतीश पांडे 

कळमेश्वर : कळमेश्वर एमआयडीसी मार्गावरील रेल्वे गेट परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे गेट वारंवार बंद राहिल्यामुळे वाहनधारक, शालेय विद्यार्थी, खेडेगावांतून शहरात येणारे नागरिक, एमआयडीसीमध्ये जाणारे कामगार तसेच रुग्णवाहिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या ठिकाणी नागरिकांना किमान ३० मिनिटे ते १ तासापर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याने, सध्याच्या वाढत्या उन्हात ही समस्या अधिकच तीव्र बनली आहे. विशेष म्हणजे, रेल्वे उड्डाणपूल किंवा अंडरपासचे काम अपूर्ण असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वे गेट परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे, पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे आणि उड्डाणपूल/अंडरपासचे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने गती देणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच वाढत्या उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूंना तात्पुरती सावली (ताडपत्री/नेट) उभारण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे संपर्क प्रमुख मंगेश लिलाधरजी गमे, तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. या निवेदनाच्या प्रती मा. मुख्याधिकारी, नगर परिषद कळमेश्वर, आमदार आशीषजी देशमुख (सावनेर विधानसभा) तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी (रस्ते वाहतूक व महामार्ग) यांना देण्यात आल्या आहेत.

सदर निवेदनाद्वारे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती शिवसेना (उ.बा.ठा.) कळमेश्वर व नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.