Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव मध्ये कचऱ्यासारखी समस्या निर्माण झालेली आहे.


 बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 पुसेगाव हे श्री सेवागिरी महाराजांचे वास्तव्याने पावन झालेले पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आलेले गाव असून सातारा पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे.येथे मोठी बाजारपेठ असून लगतच्या २५ ते३०गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पुसेगाव मध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. परंतु त्याचबरोबर कचऱ्यासारखी समस्या निर्माण झालेली आहे. ग्रामपंचायतीने येरळा नदीकाठी खाजगी जागा कचरा टाकण्यासाठी भाडेतत्त्वावर अनेक वर्षापासून घेतलेली होती परंतु तेथील लगतच्या शेतकऱ्यांनी हरकत घेऊन कचरा टाकने बंद केले. त्यानंतर ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी जागा मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी असहकार्याची भूमिका घेतली. गावातील एका ग्रामस्थाने गावापासून दूर असलेले विना वापर जागा भाडे तत्वावर दिली परंतु तिथे देखील इतर ग्रामस्थांनी हरकत घेऊन आंदोलनाची भूमिका घेतली. वास्तविक ही समस्या मुळापासून दूर होण्यासाठी ग्रामपंचायतीचा प्रयत्न सुरू होता त्याचाच भाग म्हणून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून तालुका स्तरीय प्लॅस्टिक संकलन व प्रक्रिया केंद्र तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. 

त्याचे काम काही दिवसात ग्रामपंचायतीच्या जागेत सुरू होणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य गाभा कचरा विलगीकरण यामध्ये आहे. घरातच कचरा विलगीकरण झाले नाही तर प्रकल्पाचा देखील उद्देश साध्य होणार नाही. त्यामुळे घरामध्ये कचरा विलगीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे तसेच बंदी असलेल्या प्लॅस्टिक व थर्माकॉलवर बंदी घातली तरच ही समस्या आटोक्यात येणार आहे.त्या दृष्टीने ग्रामपंचायत पुसेगाव ने महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक २३ मार्च२०१८नुसार प्लास्टिक बंदीची काटेकोर अलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून जेथे जेथे सिंगल युज प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वापरले जाते त्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. श्री सेवागिरी महाराज मठामध्ये दर गुरुवारी महाआरती  नंतर महाप्रसाद असतो तेथे पूर्णपणे स्टील ताटांचा वापर करून श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सुरुवात करण्यात आली आहे. पुसेगाव हद्दीतील सर्व मंगल कार्यालयांना प्लास्टिक ताटे न वापरणे बाबत तसेच परिसरामध्ये प्लास्टिक बंदी व ओल्या कचऱ्याचे आपल्या स्तरावर नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. गावातील विविध मंडळांना प्लास्टिक बंदी तसेच स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्व व्यापारी वर्गात दुसऱ्यांदा प्लास्टिक बंदी बाबत नोटिद्वारे शासन अधिसूचनेचे पालन करण्याचे अपील करण्यात आले आहे. 

अन्यथा दंडात्मक कारवाई सामोरे जागेला गेले याबाबत सजग करण्यात येत आहे.संपूर्ण गावांमध्ये घरोघरी विविध माध्यमातून येणारे प्लास्टिक वेगळ्या स्वरूपात साठवून ठेवण्यासाठी प्लास्टिक संकलन बँक (पिशव्या)व जाहीर आवाहन पॉम्पलेट चे वाटप गावातील अशा स्वयंसेविकांमार्फत व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. इतर सुखा कचरा व प्लास्टिक वेगवेगळ्या स्वरूपात साठवून ठेवण्याची आवाहन करण्यात आले असून आठवड्याच्या दर गुरुवारी सदरचे प्लास्टिक व इतर सुखा कचरा उदाहरणार्थ काचेच्या वस्तू फायबर लोखंडी वस्तू लाकडी वस्तू इत्यादी घंटागाडीच्या माध्यमातून जमा करता येणार आहे.कोणत्याही परिस्थितीत ओला कचरा या सोबत स्वीकारला जाणार नाही. ओला कचरा जसे की भाजीपाल्याचे रेसिड्यू, टरफले डाळिंचा कोंडा इत्यादी पौष्टिक वस्तू जनावरांच्या खाद्यासाठी वापरावेत,आपल्याकडे जनावरे नसतील तर शेजारी असतील  त्याना ते द्यावे किंवा आपल्या घराच्या बाहेर रिकामा कोपरा असेल तेथे कुजण्यासाठी टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे.जागेच्या नियोजनानुसार फक्त ओला कचरा वेगळ्या स्वरूपात गोळा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. गावातील सर्व आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,बचत गटांना याबाबत प्रशिक्षित करण्यात येत आहे. कचरा विलगीकरणाबाबत महिला शक्ती जागृत करण्यात येत असून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद महिला भगिनींकडून मिळत  आहे. उमेद अभियानातील सर्व पदाधिकारी तसेच सर्व बचत गटांच्या अध्यक्ष सचिव यांना प्रशिक्षित करून आपापल्या बचत गटांच्या महिलांना याबाबत प्रशिक्षण देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत याबाबत अत्यंत सकारात्मक काम करत असून कचरा समस्या मुळापासून कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रयत्नरत आहे.यासाठी सर्व ग्रामस्थांचे सक्रिय सहकार्य व योगदान महत्त्वाचे आहे यासाठी ग्रामपंचायतीच्या सूचनानुसार अंमलबजावणी करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे. पुढील नियोजन  उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.प.)श्री राहुल देसाई  व गटविकास अधिकारी श्री. योगेश कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 


कचरा समस्येचे निराकरण हे संपूर्ण प्लास्टिक बंदी व कुटुंब स्तरावर कचरा विलगीकरण यामध्ये आहे चेअरमन,व सर्व विश्वस्त श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट यांनी मंदिरामध्ये प्लास्टिक बंदी व महाप्रसादासाठी स्टील ताटांचा वापर करून सकारात्मक सुरुवात केली आहे.गावातील सर्वच घटक देखील सहकार्य देतील हा विश्वास आहे. ग्रामस्थांच्या मदतीने ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढली जाईल.महिला भगिनींचे सहकार्य उल्लेखनीय रित्या मिळत आहे.--नागरगोजे ए जे  ग्रामपंचायत अधिकारी