प्रतिनिधी अनिकेत चांदणे
नया अंदुरा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नया अंदुरा येथे दिनांक १० मार्च २०२६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माता-पालक मेळावा व प्रेरणादायी एकपात्री प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद बगले होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. श्री. पुंडलिकराव भामोदे, श्री. राहुल भामोद्रे (विशेष शिक्षक), प्रेमानंद भाऊ शेगोकार तसेच श्री. परघोरमोर (मुख्याध्यापक, बोरगाव वैराळे) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व संतोष दादा झामरे लिखित “शिवशाहीच्या पाऊलखुणा” हे पुस्तक देऊन करण्यात आले.
यानंतर कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलेला “मी सावित्रीबाई फुले बोलतेय…” हा प्रभावी एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. या प्रयोगात माजी मुख्याध्यापिका सुषमा राम शेगोकार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेतून स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या अथक कार्याचा जीवनपट जिवंतपणे उलगडून दाखविला. मुलींना शिक्षण देताना त्यांना सहन करावा लागलेला समाजाचा विरोध, शाळेत जाताना झालेला त्रास आणि शिक्षणाची ज्योत अखंड पेटती ठेवण्याचा त्यांचा निर्धार यामुळे उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले.
या कार्यक्रमामुळे उपस्थित पालक व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक समता आणि स्त्रीशिक्षणाबद्दल जागृती निर्माण झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा बगले यांनी केले तर ज्योती वाघमारे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.





Social Plugin