दुरुस्तीच्या पलीकडे गेलेली वाहने नगरपरिषदेच्याच जागेत उघड्यावर; परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य
सतीश पांडे
कळमेश्वर : शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या कळमेश्वर नगरपरिषद प्रशासनाच्या स्वतःच्याच गाड्या सध्या भंगार अवस्थेत धूळ खात पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेतच या नादुरुस्त वाहनांचे सांगाडे उघड्यावर फेकून देण्यात आले असून, यामुळे परिसरात कचरा आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान तर होतच आहे, शिवाय स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेच्या परिसरात असलेल्या या गाड्या आता पूर्णपणे नादुरुस्त असून त्या सुधारण्यालायक राहिलेल्या नाहीत. शासकीय नियमानुसार, अशी वाहने वापरात नसतील तर त्यांची तांत्रिक पाहणी करून लिलाव प्रक्रिया राबवणे आवश्यक असते, जेणेकरून शासनाला त्यातून महसूल मिळू शकेल. मात्र, नगरपरिषद प्रशासनाने या गाड्यांचा लिलाव करण्याऐवजी त्या उघड्यावर वाऱ्यावर सोडून दिल्या आहेत. या वाहनांसोबतच लोखंडी स्क्रॅप आणि बांधकामाचे अवशेष साचल्याने या परिसराला अक्षरशः 'भंगारवाड्याचे' स्वरूप आले आहे.
सध्या डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढत असताना, या उघड्यावरील भंगार गाड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डासांची पैदास होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. जरी या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली नसली, तरी प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, कोणत्याही क्षणी साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
प्रशासनाने स्वतःहून दखल घेण्याची गरज
नगर परिषेदेने कोणत्याही मोठ्या संकटाची किंवा औपचारिक तक्रारीची वाट न पाहता, स्वतःहून या गंभीर प्रकरणाची दखल घेणे गरजेचे आहे. स्वतःच्याच जागेत पडलेल्या या गाड्यांची विल्हेवाट लावून संबंधित परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या बातमीची दखल घेऊन प्रशासन हे भंगार हटवणार की नागरिकांच्या आरोग्याशी असाच खेळ सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin