प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही चार महिन्यांपासून हप्ता प्रलंबित; रोजगार सेवकाकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप
नांदगाव खंडेश्वर (जि. अमरावती) : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता अद्याप मिळाला नसल्याने वेणीगणेशपूर येथील लाभार्थी श्री. अशोक अंबादास घाडगे यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेणीगणेशपूर येथील रहिवासी श्री. अशोक अंबादास घाडगे व त्यांच्या आई कमला अंबादास घाडगे यांच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये घरकुल मंजूर झाले होते. शासनाकडून पहिला हप्ता मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घरकुलाच्या बांधकामास सुरुवात केली. घरकुलासोबत शौचालयाचेही बांधकाम पूर्ण झाले असून या कामाला सुमारे चार महिने उलटून गेले आहेत.
मात्र आजतागायत घरकुलाचा दुसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. घरकुलाचे काम पूर्णत्वास आले असतानाही दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यासोबतच ग्रामपंचायतीच्या सचिवांचा दाखला व आवश्यक फोटो सादर करण्याबाबत लाभार्थ्यांना वेळेवर माहिती देण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक कागदपत्रे सादर करूनही पुढील कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना अशा शासकीय प्रक्रियेची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी व रोजगार सेवकांनी लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून योजना सुरळीतपणे पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच रोजगार सेवकांकडून वारंवार पैसे मागितले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला असून या प्रकारावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित लाभार्थ्यास घरकुलाचा दुसरा हप्ता तात्काळ मंजूर करण्यात यावा व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही होत आहे. आता पंचायत समिती प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin