
पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बंद; १० रुपयांची वसुली तरीही घाणीचे साम्राज्य; सामाजिक कार्यकर्ता बिरजूभाऊ रघुवंशी कडाडले!
सतीश पांडे कळमेश्वर प्रतिनिधी
कळमेश्वर : 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या कळमेश्वर बस स्थानकावर सध्या प्रवाशांना मात्र 'नरकयातना' भोगाव्या लागत आहेत. विदर्भाच्या रणरणत्या उन्हात घसा कोरडा पडत असताना थंड पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बंद आहेत, तर अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यावरचे पंखे केवळ सांगाड्या सारखे लटकत आहेत. प्रशासनाच्या या निर्दयी कारभारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, "आम्ही माणसे आहोत की कचरा?" असा उद्विग्न सवाल आता जनता विचारत आहे.
शासकीय नियमांची पायमल्ली आणि अमानवीय वागणूक
महाराष्ट्र शासनाच्या सेवा हमी कायद्यानुसार प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि सुयोग्य बैठक व्यवस्था पुरवणे बंधनकारक आहे. मात्र, कळमेश्वर स्थानकावर या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. स्थानक परिसरात सर्वत्र अस्वच्छतेचा विळखा असून, दुर्गंधीने प्रवाशांचा श्वास गुदमरतोय. विशेष म्हणजे, शौचालयासाठी प्रवाशांकडून १० रुपये शुल्क उकळले जाते, मात्र तिथली दुरवस्था पाहून प्रवाशांना संताप अनावर होतो. बसच्या वेळेचा नेम नाही, चौकशी खिडकीवर कर्मचारी नाही; अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय?
अधिकारी म्हणतात, 'नागपूरला या'; जबाबदारीचे काय?
या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले सामाजिक कार्यकर्ता बिरजूभाऊ रघुवंशी यांनी जेव्हा जबाबदार आगार प्रमुखांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना मिळालेले उत्तर प्रशासकीय मुजोरीचा कळस गाठणारे होते. "काही बोलायचे असेल तर नागपूरला या," असे सांगून अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यातून पळ काढला. जो अधिकारी स्वतःच्या कार्यालया खालील जनतेच्या वेदना पाहू शकत नाही, तो जनतेचे प्रश्न काय सोडवणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या बस स्थानकावर जे बाथरूम काही अंतरावर बनलेले आहे त्या ठिकाणी महिला सुरक्षा करिता एकही सिक्युरिटी गार्डची व्यवस्था नाही कारण या ठिकाणी तुटलेले कंपाउंड हे टीनाचे बनलेले आहे आणि त्यामधून कोणीही येने जाने करत असते. स्वच्छता बसस्थानक मध्ये केवळ नावाची आहे इथे बाथरूम मध्ये साधे फिनाईल चासुद्धा वापर केला जात नाही.
"हा प्रवाशांच्या अंत पाहणारा प्रकार आहे!"
> "कळमेश्वर बस स्थानकावर साधे पिण्याचे पाणी मिळत नाही, ही शरमेची बाब आहे. गरीब प्रवासी आणि विद्यार्थ्यांकडून शौचालयाचे पैसे घेतले जातात, पण सुविधा शून्य आहेत. अधिकारी एसी केबिनमध्ये बसून 'नागपूरला या' म्हणत असतील, तर त्यांना सामान्य जनतेचा शाप लागेल. जर येत्या दोन दिवसांत इथले फिल्टर आणि पंखे सुरू झाले नाहीत, तर आम्ही प्रशासनाच्या या मुजोर वृत्तीविरोधात तीव्र जनआंदोलन छेडू." — बिरजू रघुवंशी (सामाजिक कार्यकर्ता )




Social Plugin