Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात एज्युसिटी उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय _प्रभारी कुलसचिव, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा प्रा.डॉ. विजय कुंभार




बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत राज्यात आठ ते दहा एज्युकेशनल सिटी (शैक्षणिक टाऊनशिप) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राच्या बळकटीसाठी करण्यात आलेल्या घोषणांच्या अनुषंगाने राज्य शासनानेही हा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

राज्यातील उच्च शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आणि देश-विदेशातील विद्यार्थी, विद्यापीठे तसेच विविध शैक्षणिक संस्थांना आकर्षित करण्यासाठी या शैक्षणिक टाऊनशिप उभारल्या जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक बनण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात अशा प्रकारची पहिली आंतरराष्ट्रीय एज्यु सिटी उभारण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या एज्यु सिटीमध्ये अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि इटली येथील सहा आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आपले शैक्षणिक प्रकल्प सुरू करणार आहेत. त्यासाठी संबंधित विद्यापीठांशी सामंजस्य करारही करण्यात आले असून येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठांचे अभ्यासक्रम सुरू होण्याची अपेक्षा आहे.

भारतामधील अशा प्रकारची ही पहिली आंतरराष्ट्रीय एज्यु सिटी ठरणार असून तिच्या विकासासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय अमरावती शहरामध्येही विविध शिक्षण संस्थांना एकत्रित करून डॉ. पंजाबराव देशमुख एज्युकेशनल सिटी उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

एकूणच, राज्यातील शिक्षण क्षेत्राला जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच संशोधन, नवोन्मेष आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी हा निर्णय अत्यंत सकारात्मक आणि दूरदृष्टीचा ठरणार आहे. महाराष्ट्राला शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनविण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जावे लागेल.