Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय 'पॉझिटिव्ह जर्नालिझम' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भारत सवने व डॉ. साक्षी भारूका यांचा सत्कार.



प्रतिनिधी :- लक्ष्मण बिल्हारे 

देशातील पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'राज्यस्तरीय पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार' जाहीर झाला असून, यामध्ये मराठवाडा विभागातून परतूरचे पत्रकार भारत सवणे यांची निवड करण्यात आली आहे. सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतल्याबद्दल पत्रकार भारत सवने यांना हा बहुमान मिळाला असून, या निवडीमुळे जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याबद्दल भारत सवने यांचा व नुकत्याच डॉक्टर पदवी मिळवल्याबद्दल डॉ. साक्षी भारूका यांचा व्हॉइस ऑफ मिडिया च्या पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

     समाजात नकारात्मकतेचे सावट असताना केवळ समस्यांवर बोट न ठेवता, त्यातून मार्ग काढणाऱ्या आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या बातम्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने हा विशेष पुरस्कार दिला जातो. पत्रकार भारत सवणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतानाच, प्रशासकीय पातळीवर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल राज्य स्तरावर घेतली गेल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

या पुरस्काराचे वितरण १५ मार्च २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण (वाय. बी. चव्हाण) सेंटर येथे एका भव्य सोहळ्यात होणार आहे. या कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल मा. हरिभाऊ बागडे, महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. मंगलप्रसाद लोढा, श्रीमती अमृता फडणवीस यांच्यासह राज्यातील राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

परतूर सारख्या ग्रामीण भागातून येऊन राज्य पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या पत्रकार भारत सवणे यांच्या या यशाबद्दल जालना जिल्ह्यातील पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

   या सत्कार समारंभाला व्हॉईस ऑफ मिडिया चे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील मुके, सचिव मुमताज अन्सारी, प्रवक्ते अर्जुन पाडेवार, माजी अध्यक्ष, अजय देसाई यांच्यासह जेष्ठ पत्रकार राजकुमार भारूका, केदार शर्मा, माणिक जैस्वाल, संजय देशमाने, कैलास सोळंके, सरफराज नाईकवाडी, अशोक ठोके, प्रा. शरद बोराडे, राज भडर्गे, तारेख शेख, सचिन खरात व लक्ष्मण बिल्हारे व जेष्ठ नागरिक भास्करराव चव्हाण आदी उपस्थित होते.