छायाचित्र _ पुसेगाव - कला व वाणिज्य महाविद्यालयात प्लास्टिक मुक्त परिसर या कार्यक्रमात मार्गदर्शन श्री.ए.जे.नागरगोजे व्यासपीठावर,प्रा.डाॅ. संजय क्षीरसागर,प्रा.डाॅ.किरण कुंभार,प्रा. डॉ.हनुमंत निमसे छाया - प्रकाश राजेघाटगे बुध ग्रामपंचायत अधिकारी श्री.ए.जे.नागरगोजे,
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
गावागावात कचरा समस्या आणि सांडपाणी समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या समस्यांवर उपाय करण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे तरच गावाचा विकास होतो असे प्रतिपादन पुसेगावचे ग्रामपंचायत अधिकारी श्री.ए.जे.नागरगोजे यांनी केले. पुसेगाव येथील,कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित 'प्लास्टिक मुक्त परिसर' या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद ,प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.के.जी.कुंभार आणि प्रा.डाॅ.एच.जी.निमसे उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात श्री. नागरगोजे म्हणाले,'कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास गावाचा आणि परिसराचा विकास साधता येतो. यासाठी गावात योग्य कचरा डेपो उभारणे आणि कचरा वेगवेगळा जमा करणे आवश्यक आहे.ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून पिशवीत टाकावा आणि तो घंटागाडीच्या माध्यमातून योग्य ठिकाणी पाठवावा. यामुळे परिसर स्वच्छ राहतो आणि पर्यावरणाचे रक्षण होते. स्वच्छता ही केवळ सवय नसून ती आपल्या संस्कृतीचा भाग आहे. संतांनीही स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संत तुकडोजी महाराजांनी गावाला तीर्थक्षेत्र समजून स्वच्छ ठेवण्याची शिकवण दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम देखील स्पष्ट केले. जास्त आवाजामुळे मानवाचे आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही बाधित होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळणे ही देखील काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.संजय क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी कचरा गोळा करण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकत ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आवश्यक असून महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक मुक्त जीवनशैलीचा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.के.जी.कुंभार यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.एस.आर.धोंगडे यांनी मानले तर आभार प्रा.डाॅ.एच.जी.निमसे यांनी मानले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin