बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
लोकशाहीत भारताची राजधानी जशी दिल्ली आहे त्याप्रमाणे मराठा साम्राज्याची गेली सव्वातीनशे वर्षे राजधानी सातारा शहर आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी जगाला हेवा वाटेल असे उत्कृष्ट स्थापत्त्य कलेचा अविष्कार सातारा शहर बांधण्यात केला आहे. अखंड हिंदुस्तानचे सातारा हे साधारणपणे शंभर वर्षे राजधानीचे शहर होते. याउलट दिल्ली हे जरी मुगल राजवटीचे प्रमुख शहर होते तरी दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी येथील शासकांना त्यांच्याच आप्तांचा पराभव करावा लागला. आलमगीर औरंगजेब यांने तर स्वतःच्या वडिलांची व भावांची हत्या करून दिल्लीची सत्ता मिळवली, त्यामुळे दिल्लीश्वर बादशाही इतिहास कायम रक्तरंजीत राहिला आहे. त्यामुळे सातारची गादी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर न्यायाची व पराक्रमाची साक्ष देते आणि या कारणानेच प्रत्येक भारतीय सातारा शहराचा उल्लेख अत्यंत आदराने करतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते यांनी एक वैचारिक व शाश्वत विकासाचे राजकारण देश व देशभर व राज्यभर केले. नंतरच्या काळात अभयसिंग राजे भोसले, विलासराव पाटील उंडाळकर व वर्तमानात श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपापल्या परीने सातारची सेवा केली. या सर्व नेत्यांनी सातारची प्रतिष्ठा कायम राखली, पण गेल्या काही दिवसातील घटनाक्रम पाहता सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या थोर इतिहासाला काळीमा फासण्याचे किमया केली असे खेदाने नमूद करावी लागेल.
गेल्या विधानसभेला महायुतीने सातारा जिल्ह्यात अवाढव्य असे यश संपादन केले. आठ पैकी चार आमदार कॅबिनेट मंत्री ही झाले त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना भेटेल असे सामान्य जिल्हा वासियाची वाटत होती, परंतु गेल्या दीड वर्षात या चारही मंत्र्यांनी कोणताही मोठा प्रकल्प सातारा जिल्ह्यात आणला असे ऐकिवात नाही. परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाने सातारचे प्रतिमा धुलीन करण्याची पाप झाले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा विरुद्ध महायुतीतील शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस( संयुक्त) असा सामना झाला. या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बहुमताचा आकडा पार केला. परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळेस एक वेगळेच नाट्य घडले. राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आलेल्या तीन सदस्यांनी भाजपाच्या पारड्यात वजन टाकले. जर हे तीन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आले आहेत तर गेल्या महिन्याभरात असे काही लोकपयोगी काय निर्णय झाले त्यामुळे ह्या लोकांनी पक्षनिष्ठा सोडून भाजपाच्या गोटात सामील होण्याचा खटाटोप केला याचे कारण ईश्वरास ठाऊक असेच म्हणावे लागेल किंवा या लोकांनी आर्थिक लोभा पायी स्वाभिमान गहाण ठेवला असेच म्हणावे लागेल. हीच गत शिवसेनेच्या काही सदस्यांनी केली. खरे पाहता शिवसेनेच्या या सदस्यांच्या बद्दल जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे आश्चर्य व्यक्त केले जात नाही कारण शिवसेनेचे हे दोन सदस्य ज्यांचे नेतृत्व मानतात ते कोरेगावचे आमदार श्री महेश शिंदे यांचा नेमका पक्ष कोणता आहे हे तालुक्यातील व जिल्ह्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे. कारण शिवसेनेचे आमदार असलेले श्री महेश शिंदे यांच्याच पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर नुकत्याच विराजमान झाल्या आहेत.
*मंञ्याना धक्काबुक्की*
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी वेळी एक अभूतपूर्व असा गोंधळ संपूर्ण राज्याने पाहिला. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले श्री शंभूराजे देसाई व मंत्री श्री मकरंद पाटील यांना पोलिसांनीच धक्काबुक्की केली. कारण काय तर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी निवडून आलेले सदस्य यांचे मतदान योग्य ठिकाणी व्हावे यासाठी ही मंडळी प्रयत्नशील होती. परंतु जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जर धक्काबुक्की होत असेल तर सामान्य लोकांची काय अवस्था होते याची शक्यता सुद्धा करवत नाही. महायुती म्हणून सरकार स्थापन होत असताना एकामेकांच्या हातात हात घालून सत्तेवर आलेले हे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेतील सत्ता मिळवण्यासाठी पानवट्यावरील स्त्रियासारखी भांडणे करत आहेत हे पाहून जिल्हा वासियांची मान शरमेने खाली झाली. ज्या जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आहे, ज्याचा उल्लेख यशवंत विचाराचा जिल्हा असा प्रत्येक जिल्हावासीय करतो त्या सामान्य मतदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम वरील कृत्याने झाले असे म्हणावे लागेल. बर यावेळी अजून एक शरमेची बाबाची झाली की, दोन जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. आणि ही गोष्ट प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षात होत असेल तर लोकशाहीची क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. आणि या सर्व गोष्टीला कोणी राजकीय चनाक्षेपणा म्हणत असेल, तर त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
छत्रपती शाहू महाराजांची नगरी म्हणून सातारा शहराचा दबदबा अखंड हिंदुस्तानात आजही आहे. सातारची गादी ही पराक्रमाची व न्यायाची परंपरा आहे या परंपरेला जोड देण्याचे काम या आधीच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे व तीच परंपरा वर्तमानातील लोकप्रतिनिधींनी करावी. जिल्ह्याला कधी नव्हे ते चार मंत्री पदे मिळाली आहेत त्याचा उपयोग शाश्वत विकासासाठी व्हावा हीच भावना जनमानसाची आहे त्यामुळे झालेला प्रकार हा परत होऊ नये यासाठी आम्ही श्री छत्रपती शाहू चरणी कान धरून लोटांगण घेत आहोत आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आमचा विनंती वजा अर्ज आहे सातारा हा साताराच आहे त्याची दिल्ली करू नका.
विकासासाठी भांडण करा
जिल्ह्यातील जनतेपुढे अनेक प्रश्न आहेत. जिल्ह्यातील युवक नोकरीसाठी पुणे मुंबईची वाट धरतात. अजूनही जिल्ह्यात एक सुसज्ज अशी एमआयडीसी नाही. लिंबखिंडीतील आयटी पार्कचे काय झाले किंवा मेडिकल कॉलेज कधी सुरू होणार याबाबत जिल्ह्यातील कुठलाच लोकप्रतिनिधी आत्मीयतेने प्रश्न मांडत नाही. म्हणून तर जिल्ह्यातील जनता या लोकप्रतिनिधीकडून एकच अपेक्षा आहे की सत्तेसाठी भांडण करण्यापेक्षा विकासासाठी भांडण करा.





Social Plugin