पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे
पाटस/पुणे: दौंड तालुक्यातील पाटस आणि कानगाव परिसरात कार्यरत असलेल्या सिमेंट ग्राइंडिंग युनिट्समधून मोठ्या प्रमाणावर उडणाऱ्या धुळीमुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, या गंभीर प्रदूषणामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. पाटस येथील 'श्री सिमेंट लिमिटेड' आणि कानगाव हद्दीतील 'अंबुजा/अदानी सिमेंट' या दोन्ही प्रकल्पांतून अहोरात्र धुळीचे लोट हवेत सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या धुळीचे जाड थर आसपासच्या शेतातील पिकांवर साचत असल्याने पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. केवळ शेतीच नव्हे, तर या प्रदूषणामुळे स्थानिक रहिवासी, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे गंभीर विकार, खोकला आणि डोळ्यांची जळजळ अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार विनंती करूनही कंपनी प्रशासनाकडून धूळ रोखण्यासाठी पाण्याचा फवारा मारणे किंवा इतर प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. या संतापजनक प्रकाराबाबत ग्रामस्थांनी आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केली असून, दोषी कंपन्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रदूषणाची दखल घेऊन धूळ नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश न दिल्यास, आगामी काळात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.





Social Plugin