पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे
दौंड/पुणे: महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयांसाठी सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी कामकाजाची वेळ निश्चित केलेली असतानाही, दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयात या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा प्रशासकीय व आर्थिक त्रास सहन करावा लागत असून, या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी आरटीआय व सामाजिक कार्यकर्ते अमर मधुकर जोगदंड यांनी केली आहे. नागरिकांकडून प्राप्त तक्रारींनुसार, हे कार्यालय वेळेवर उघडले जात नाही आणि कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने कामांचा डोंगर साचला आहे. कामकाजात होणाऱ्या अनावश्यक विलंबामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ आणि भारतीय दंड संहिता (IPC) कलम १६६ अंतर्गत कायद्याचे उल्लंघन असून, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा कार्यान्वित करावी आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी, अशा मागण्या जोगदंड यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करावे, अन्यथा या अन्यायाविरोधात कायदेशीर लढा अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.





Social Plugin