Ticker

6/recent/ticker-posts

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांची राज्यपालांसोबत बैठक



बुध   दि. [ प्रकाश राजेघाटगे: 

राज्यातील समूह विद्यापीठांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज दुपारी १२ वाजता लोकभवन, मुंबई येथे माननीय राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत समूह विद्यापीठांच्या गुणवत्तावाढीबाबत आणि राष्ट्रीय स्तरावरील मानांकन सुधारण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती मा. जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले की, समूह विद्यापीठे नव्याने स्थापन झाली असली तरी त्यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये जुनी व नामांकित आहेत. त्यामुळे या विद्यापीठांनी राष्ट्रीय विद्यापीठ मानांकनामध्ये आपले स्थान उंचावण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. गुणवत्ता वृद्धीसाठी ठोस आणि नियोजनबद्ध उपक्रम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी श्री. चंद्रकांत दळवी, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार, राज्यपाल यांचे सचिव मा. डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह राज्यातील इतर समूह विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिव उपस्थित होते.

विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना क्षयरोगाचे (टीबी) समूळ उच्चाटन होणे आवश्यक असल्याचे नमूद करून राज्यपालांनी ‘टीबी मुक्त भारत’ अभियानात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे आवाहन केले. यासाठी विद्यापीठांनी पोस्टर स्पर्धा, मराठी व हिंदी भाषेतील जिंगल्स स्पर्धा तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सुचविले.

बैठकीदरम्यान समूह विद्यापीठांनी आपल्या कार्याचा आढावा सादर केला. यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, सर्वोत्तम पद्धती, संशोधन प्रकल्प, कौशल्य विकास अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची नोंदणी, वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी तसेच देश-विदेशातील विद्यापीठांसोबत सुरू असलेल्या सहकार्याची माहिती राज्यपालांना देण्यात आली.