Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नागरिकांनो सावध राहा! स्मार्ट कार्डसाठी १९९ रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊ नका




पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे

दौंड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड योजनेत दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक फसवणूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाने या कार्डासाठी १९९ रुपये शुल्क निश्चित केले असताना, प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांकडून २२० ते ४०० रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केला आहे. शासकीय नियमानुसार, स्मार्ट कार्डसाठी नोंदणी शुल्क १६८ रुपये आणि १८ टक्के जीएसटी मिळून एकूण १९९ रुपये आकारणे बंधनकारक आहे. मात्र, दौंड एस.टी. डेपो आणि तालुक्यात इतर ठिकाणी हे कार्ड देताना जादा पैसे घेतले जात आहेत. ग्राहक पंचायतीचे दौंड शहर अध्यक्ष श्री. गणेश मनोहर जगताप यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, पावतीवर १९९ रुपये असे स्पष्ट नमूद असतानाही, प्रत्यक्षात नागरिकांकडून २१ ते २०० रुपयांपर्यंत जादा रक्कम घेतली जात आहे.

​दिवसाला सरासरी ३०० ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी येत असल्यास, केवळ २१ रुपयांच्या हिशोबानेही ४४ दिवसांत सुमारे २ लाख ७७ हजार रुपयांहून अधिक रक्कम बेकायदेशीरपणे वसूल केली गेल्याचा अंदाज तक्रारीत वर्तवण्यात आला आहे. या संदर्भात गणेश जगताप यांनी एम.एस.आर.टी.सी. चे व्यवस्थापकीय संचालक, पुणे जिल्हाधिकारी आणि परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठवून सखोल चौकशीची मागणी केली आहे. जादा शुल्क आकारणाऱ्या केंद्रांची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर किंवा एजंटवर कडक प्रशासकीय कारवाई करावी आणि नागरिकांकडून जादा घेतलेली रक्कम त्यांना परत मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. "ज्येष्ठ नागरिकांची ही आर्थिक पिळवणूक गंभीर असून ती थांबवणे आवश्यक आहे," असे सांगत जगताप यांनी नागरिकांना १९९ रुपयांपेक्षा जास्त पैसे न देण्याचे आणि प्रत्येक व्यवहाराची अधिकृत पावती घेण्याचे आवाहन केले आहे. जादा रक्कम मागितल्यास दौंड डेपो मॅनेजर किंवा पुणे विभाग नियंत्रकांकडे तक्रार नोंदवावी, असेही ग्राहक पंचायतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.