
नेर तलावात पाणी असताना खटाव तहानलेला
बुध दि [ प्रकाश राजेघाटगे]
नेर तलावात सुमारे 70 टक्के पाणीसाठा असतानाही खटाव तालुक्यातील गावांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. येरळा नदी व नेर कॅनॉलला तात्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी पुरस्कृत पिंपळेश्वर संघटना व जनसेवा संघटनेच्या वतीने खटाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी कृष्णा सिंचन प्रशासनाला थेट इशारा देत, “हे आंदोलन राजकीय नसून प्रतीकात्मक आहे. येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष पाणी सोडले नाही तर शेतकरी व जनहितासाठी नेर तलावाचे दरवाजे कायदा हातात घेऊन तोडू,” असा आक्रमक पवित्रा घेतला.
या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव कुदळे, मुगुटराव पवार, रसूल मुलाणी, किशोर डंगारे, विजय बोबडे, राजेंद्र करळे, दादा मोहिते, अमर देशमुख, महेश देशमुख, मनोज देशमुख, राहुल शिंदे, युवराज शिंदे, मुसा काझी, तानाजी माने, किसन जगताप, बाळासाहेब देसाई, वसंतराव जाधव, अभय भोसले, गजानन लावंड, संभाजी जाधव यांच्यासह खटाव, भांडेवाडी, लोणी, धकटवाडी, खातगुण आदी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रदीप विधाते म्हणाले, नेर तलावाची निर्मिती ही खटाव तालुक्यातील गावांच्या सिंचन व पाणीपुरवठ्यासाठीच झाली आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने तलाव 100 टक्के भरला होता. मात्र गेल्या चार महिन्यांपासून एकही आवर्तन येरळा नदी आणि नेर कॅनॉलला सोडले गेले नाही. त्यामुळे खटाव तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांवर गंभीर पाणीटंचाई ओढवली आहे. नेर तलावातील नैसर्गिक पाणीसाठ्यावर सर्वप्रथम खटाव तालुक्याचा हक्क आहे. तरीही आमच्यावर अन्याय होत असून, प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसांपासून नेर तलावातून माण तालुक्यातील आंधळी धरणात पाणी सोडले जात आहे. माण तालुक्याला पाणी देण्यास आमचा कोणताही विरोध नाही; मात्र खटाव तालुक्यालाही पहिला न्याय मिळणे अत्यावश्यक आहे. “माणमध्ये जनता राहते, तसेच खटावमध्येही माणसेच राहतात, जनावरे नाहीत—याची जाणीव प्रशासनाने ठेवावी,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. नेर तलावातील पाणीसाठ्यावर पहिला हक्क खटाव तालुक्याचा असून, जिहे कठापूर योजनेच्या पाण्यावर केवळ माण तालुक्याचा अधिकार आहे. खटावकडे दुर्लक्ष होऊ नये, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. “ इथून पुढे असा चुकीचा भेदभाव सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत खटाव तालुक्याला न्याय द्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन उभे राहील,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव कुदळे म्हणाले, “आमचा रस्ता रोको हा पूर्णपणे लोकहिताचा असून कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेवरच आमचा आक्षेप आहे.” प्रदीप विधाते व राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवसांपूर्वी सिंचन विभागाला निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
दरम्यान, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातील पिके करपू लागली आहेत, तर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. येरळा नदी व नेर कॅनॉलला तात्काळ पाणी सोडल्यास नदीकाठच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी पुन्हा कार्यान्वित होतील आणि शेतीला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृष्णा सिंचन विभागाचे उपअभियंता प्रशांत डीसले यांनी सांगितले की, नेर तलावात सुमारे 65 टक्के पाणीसाठा असून आंधळी धरणात केवळ 8 टक्के पाणी आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नेर तलावातून आंधळी धरणात पाणी सोडले जात असून तेथून दहिवडी नगरपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू आहे. “आंधळी धरणात 25 ते 30 टक्के पाणीसाठा झाल्यानंतर येरळा नदीला पाणी सोडण्याचे वरिष्ठांचे निर्देश आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या स्पष्टीकरणावर आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. अखेर कृष्णा सिंचन प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर आठ दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी दोन पावले मागे घेत आंदोलन स्थगित केले. तरीही आंदोलकांनी इशारा दिला आहे की, ठरलेल्या मुदतीत पाणी सोडले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. “खटावचा हक्काचा पाणीप्रश्न सोडवला नाही तर आम्ही शांत बसणार नाही,” असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी वसंतराव जाधव, राजेंद्र करळे, राहुल जमदाडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सपोनि संदीप पोमण आणि सपोनि नागनाथ खुणे व पुसेगाव पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता.
लोकप्रतिनिधींच्या घोषणांत बारमाही पाणी, वास्तवात दुष्काळाच्या झळा : प्रदीप विधाते
येरळा नदी व नेर कॅनॉल बारमाही वाहतील, या घोषणांमुळे खटावसह पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांमध्ये मोठी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात गेल्या चार–पाच महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. आश्वासनांवर विश्वास ठेवलेल्या जनतेला दुष्काळाच्या गर्तेत ढकलले गेल्याची भावना निर्माण झाली आहे. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणे, ही खटावच्या जनतेसाठी अत्यंत दुर्दैवी बाब ठरत आहे.— प्रदीप विधातेमाजी उपाध्यक्ष, जि. प. सातारा
महाराष्ट्र दिनी कायदा हातात घेण्याचा इशारा
आंधळी धरण 25 टक्के भरण्यास आणखी दोन महिने लागणार असतील, तर तोपर्यंत खटाव तालुक्यातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवणार का, असा संतप्त सवाल प्रदीप विधाते यांनी उपस्थित केला. येत्या आठ दिवसांत नेर तलावातून येरळा नदी व नेर कॅनॉलला 30 एप्रिलपर्यंत पाणी सोडावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. अन्यथा 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाईलाजाने कायदा हातात घेऊन नेर तलावाचे दरवाजे तोडावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास परिस्थिती अधिक तीव्र होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




Social Plugin