पिकांसह शेतकऱ्यांचीही स्वप्नं जळताहेत
बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्याला जणू निसर्गानेच कोंडीत पकडले आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीने खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला; तर यंदा उन्हाळ्याच्या तडाख्यात पाण्याअभावी रब्बी आणि नगदी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. “या वर्षी तरी पाणी मिळेल” या अपेक्षेवर आले, ऊसासारख्या नगदी पिकांची लागवड करणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांसमोर आज पिके सुकत चालली आहेत. ही केवळ पिकांची नव्हे, तर आशा-अपेक्षांची करपणारी कहाणी आहे. नेर तलावात सध्या सुमारे ६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नेर कॅनॉल आणि येरळा नदी कोरडीच आहे. कागदोपत्री उपलब्ध असलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. प्रशासन तांत्रिक कारणांचा दाखला देते, तर लोकप्रतिनिधी श्रेयवादाच्या राजकारणात व्यस्त दिसतात. या दोन्हींच्या मधोमध शेतकरी मात्र अक्षरशः होरपळत आहे.
*जिहे-कठापूर सिंचन योजनेचा प्रवास*
खटाव आणि माण तालुके हे परंपरेने दुष्काळी पट्ट्यात मोडणारे भाग. या भागासाठी जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना ही ‘लाईफलाईन’ ठरेल, अशी मोठी अपेक्षा होती. या योजनेचा प्रवास पाहिला तर अनेक टप्प्यांतून ती पुढे सरकली—निधी, मंजुरी, तांत्रिक अडचणी, राजकीय इच्छाशक्ती या सर्वांचा मिलाफ या योजनेत दिसतो. अखेर या योजनेचे पाणी नेर आणि आंधळी तलावापर्यंत पोहोचले, ही बाब नक्कीच दिलासादायक आहे. मात्र, योजना अस्तित्वात येणे आणि तिचा लाभ वेळेवर व नियोजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे यामध्ये मोठी दरी आहे. आजही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाण्याचा लाभ मिळत नसल्याने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
*जलपूजन की केवळ इव्हेंटबाजी?*
जिहे-कठापूर आणि नेर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचे जलपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. सर्व लोकप्रतिनिधींनी नारळ फोडत पाण्याचे स्वागत केले, सोशल मीडियावर छायाचित्रांची रेलचेल झाली आणि तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सुटल्याचे चित्र उभे केले गेले. परंतु प्रत्यक्षात नदीला पाणीच न सोडल्याने या कार्यक्रमांवर “इव्हेंट मॅनेजमेंट”ची टीका होत आहे. शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न घुमतो—“जलपूजन झाले, पण पाणी गेले कुठे?” हा सवाल केवळ नाराजीचा नसून वास्तवाचे भेदक चित्र उभे करणारा आहे.
*पाणी गेलं कुठं?—शेतकऱ्यांचा जळजळीत सवाल*
येरळा नदीचे कोरडे पडलेले पात्र आजच्या परिस्थितीचे जिवंत प्रतीक आहे. पूर्वी जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी ही नदी आज वाळूने भरलेली आणि भेगाळलेली दिसते. नदी कोरडी पडल्याने परिसरातील विहिरींचे पुनर्भरण थांबले असून, बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरवेलही निष्प्रभ ठरत आहेत. परिणामी बागायती पिके जळत आहेत, तर जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. दूध उत्पादनात घट होत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याच्या मार्गावर आहे. एक संकट दुसऱ्याला जन्म देत आहे आणि त्याची साखळी आता स्पष्टपणे दिसत आहे. नेर कॅनॉललगतच्या विहिरींनी तर डिसेंबर मध्येच तळ गाठला आहे.
*राजकारणापलीकडे जाऊन निर्णयाची गरज*
या संपूर्ण परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. दुर्दैवाने, श्रेयवादाच्या राजकारणामुळे प्रश्नाच्या मुळाशी जाण्याऐवजी केवळ प्रतीकात्मक कार्यक्रमांवर भर दिला जात आहे. पाणी हा राजकीय मुद्दा नसून जीवनाचा प्रश्न आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्व पक्षांनी एकत्रितपणे समन्वय साधून तातडीचे निर्णय घेणे गरजेचे आहे. प्रशासनानेही तांत्रिक कारणांचा आधार घेत विलंब न करता परिस्थितीनुरूप लवचिकता दाखवणे आवश्यक आहे.
*वेळेवर पाणी द्या, नाहीतर आशांचा बांध फुटेल!*
खटावच्या बळीराजाची मागणी फार मोठी नाही, त्याला फक्त वेळेवर पाणी हवे आहे. नेर तलावात पुरेसा पाणीसाठा असताना तो शेतापर्यंत पोहोचवणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. अन्यथा, अतिवृष्टी आणि दुष्काळ या दोन्ही संकटांमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचा विश्वास ढासळेल. आज गरज आहे ती तातडीच्या निर्णयाची, प्रभावी अंमलबजावणीची आणि ठोस कृतीची. नेरचे पाणी जर वेळेवर सोडले, तर ते केवळ पिकांना नवसंजीवनी देणार नाही, तर शेतकऱ्यांच्या आशांनाही नवे बळ देईल. अन्यथा, हीच आस उद्याच्या संतापात परिवर्तित होईल आणि त्याची जबाबदारी टाळता येणार नाही.
उरलेलं आयुष्य उद्ध्वस्त होईल : सत्यम जाधव
ऊस वगळता इतर पिकांत उत्पादन खर्चही निघत नाही; गेली तीन वर्षं बाजारभाव नसल्याने आमचं अर्थकारण पूर्ण कोलमडलं आहे. गतवर्षी ५०–६० हजार रुपये खर्चून आलेची लागवड केली, त्यावर लाखो रुपये खते व औषधांवर खर्च केला. पण आता पाण्याअभावी पिकं सुकू लागली आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि जनावरांसाठी मका पेरली आहे, ती ही वाया गेली आहे. गेली तीन ते चार महिन्यापासून नेर कॅनॉल आणि येरळा नदी कोरडी असल्याने सगळं डोळ्यांसमोर जळताना पाहतोय. जनावरांसाठी चारा-पाणी नाही, कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढतंय. नेर तलावात पाणी असूनही ते शेतात येत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. तातडीने पाणी सोडले नाही, तर शेतकऱ्यांचं उरलेलं आयुष्यही उद्ध्वस्त होईल. सत्यम मोहन जाधव शेतकरी, पुसेगाव





Social Plugin