उन्हाळी मशागतीत शेतकरी व्यस्त; ट्रॅक्टरने जमीन नांगरणी सुरू
बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
खरिपाच्या अपेक्षा ठेवत रखरखत्या उन्हात बळीराजा उन्हाळी मशागतीसाठी सरसावला आहे. आकाशात भरून येणाऱ्या नभासोबत शेतकऱ्यांचे खरिपाचे स्वप्नही मनात रंगत आहे. रब्बी पिकातून रिकामे झालेले रान टणक होण्यापूर्वी शेतकरी नांगरणीचे कामे पूर्ण करत असल्याचे चित्र बुध परिसरासह शिवारात पहायला मिळत आहे. बळीराजा बैलांएवजी यांत्रिकीकरणास पसंती दिल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यातच सूर्यान आग ओकण्यास सुरुवात केली आहे. सध्या रान मोकळे झाले असून रान भेगाळू लागले आहे, यामुळे शेतकरी खरीप मशागतीकडे आतापासूनच आकर्षित झाला आहे. जमीन भेगाळल्याने शेतकरी उन्हाळी मशागतीत मम्न झाला असून सर्वत्र शेतकरी नांगरण्यावर भर देत आहेत. शेतकऱ्यांनी बैल ऐवजी यंदाही यांत्रिकीकरणास पसंती दर्शवत ट्रॅक्टरच्या नांगरटीवर भर दिला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरच्या नांगरणीचे दर वाढले असले तरी कमी वेळेत काम होत असल्याने बैलांच्या सहाय्याने नांगरणीकडे सुमारे ९९ टक्के शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आता उन्हाळ्यातच जमीन नांगरल्यास जमीन भेगाळण्याचा ताण न राहता जमीन ऊन खाऊन चांगली पिकते. काही ठिकाणी कोरडवाहू शेताची नांगरणी होऊन उन्हाळी मशागती आटोपल्या आहेत. बागायती क्षेत्रात मशागती सुरु असल्याचे दिसत आहेत. ट्रॅक्टरने शेत नांगरताना ट्रॅक्टरजवळ जमिनीतून निघणारे किटक खाण्यासाठी बगळ्यांची रेलचेल झाल्याचे पाहून बगळ्याची शाळाच भरल्याच
चित्रही पाहावयास मिळत आहे. दरम्यान, दिवसेंदिवस शेतीमालाचे बाजारभाव कमी होत असून मागणी मात्र वाढताना दिसत आहे. मजूर टंचाई व मजुरीच्या वाढत्या दराबरोबरच रासायनिक खतांच्या वाढत्या किंमतीमुळे शेती व्यवसाय अवघड झाला आहे. शेतीत केलेला खर्च व उत्पादनाच्या बाजारातून मिळणाऱ्या पैशांचा मेळ बसत नाही. त्यामुळे दिवसागणिक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे. वाढत्या महागाईमुळे शेतीसाठी लागणारा खर्च करावाच लागतो. त्याचप्रमाणे मशागतीसाठीही मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मशागतीचे दरही गगनाला भिडले आहेत. वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करत उत्पादीत केलेल्या शेतमालास पुरेसा बाजारभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे.
शेतमजुरांची मनधरणी
दहा बारा वर्षांपूर्वीची परिस्थीती आता राहिली नाही. मजुरांचे वाढते भाव, त्यांचे स्थलांतर व वाढत्या तापमानाचा परिणाम या सर्व गोष्टींवर होत आहे. शेतातील काडी-कचरा वेचायलासुध्दा मजुराची मनधरणी करावी लागत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरने रोटा व्हेटर वापरून मशागत करून घेवे लागत आहे.
डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करावयाच्या कामांचे दर वाढवावे लागले, खर्च आणि शिल्लक यांचा ताळमेळ बसत नसल्याने तोट्यात धंदा जाऊ लागला. कोणताही व्यवसाय तोट्यात करणे शक्य नाही. म्हणून दर वाढले, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अक्षय काळोखे - ट्रॅक्टर व्यवसायिक
धावपळीच्या युगात शेतीचे कामे लवकर व्हावी यासाठी ट्रॅक्टरला अवजारे जोडून शेतीची कामे केली जातात. आज जवळपास सर्व शेतकरी ट्रॅक्टरने शेती करत आहेत. परंतु डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे मशागतिचे दर वाढले आहे. शेती आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. शासनाने शेतीच्या कामासाठी वापरत असलेल्या अवजारांना मिळणारे डिझेलचे भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. - केतन गायकवाड , शेतकरी बुध चौकट_ ३ ) सध्या बाजारात एका बैलजोडीची किंमत एक ते सव्वा लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्यातच वर्षभर बैलांची राखण करणे, त्यांना खाद्य पुरवणे आदी न परवडणारी कामे शेतकऱ्यांना करावी लागतात. मात्र, पॉवर टिलर व ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना ३५ ते ५० टक्के अनुदान शासनाकडून मिळते. त्यामुळे ते पॉवर टिलरकडे वळताना दिसत आहे. हा एक सोपा उपाय असून यातून मेहनत कमी होऊन नांगरणी चांगल्या प्रकारे होत आहे. -जीवन खोत शेतकरी बुध





Social Plugin