Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव खंडेश्वरमध्ये बंद जलकुंभ सुरू करण्यासाठी अभाविपचे आंदोलन



प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कार्यालयावर गुरुवारी आंदोलन करण्यात आले. बस स्टँड परिसरातील नागरिक व प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला जलकुंभ (पाणपोई) अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

अभाविपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीच्या27 मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने जलकुंभ सुरू करण्याची मागणी केली. यावर मुख्य अधिकाऱ्यांनी दहा दिवसांच्या आत जलकुंभ सुरू करून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधित अतिक्रमण हटवून पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरळीत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अभाविपकडून इशारा देण्यात आला की, प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कार्यवाही केली नाही तर जलकुंभाच्या टाकीवर बसून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात अभाविपचे विभाग संयोजक ओम धोटे, विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य तेजस राजेश पाठक, अमन काकडे, अनिकेत चव्हाण, प्रसाद भगत, संचित इंगोले, विशाल काळेकर, राम देशमुख, नयन कापडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.