: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन.!!
मन्सूर शहा . धोत्रा . भ.बुलडाणा दि.26 (जिमाका):
बकरी ईद (ईद-अल-अजहा) हा सण त्याग, बलिदान, सौहार्द आणि शांततेचा संदेश देणारा सण आहे. हा सण सर्वांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक अशा ७० हून अधिक ठिकाणावरून अधिकारी व शांतता समितीचे सदस्य दृक्श्राव्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून जोडले गेले होते.
जिल्हाधिकारी डॉ. देवरे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये यापूर्वीच शांतता समितीच्या बैठका पार पडल्या असून, सर्व सदस्यांनी सण शांततेत साजरा करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण असून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तसेच तात्पुरत्या कत्तलखान्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी आपल्या परिवारासह हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा.
जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांनी सांगितले की, ईदच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे सज्ज आहे. प्रतिबंधित जनावरांची अवैध तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीमांवर आणि संवेदनशील ठिकाणी २४ तास कार्यरत राहणारे विशेष चेक नाके (तपासणी नाके) उभारण्यात आले आहेत. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी या नाक्यांवर अहोरात्र लक्ष ठेवून असतील. कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर हालचाल किंवा सामाजिक शांतता भंग होण्याबाबत काहीही संशयास्पद माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक तांबे यांनी केले.





Social Plugin