Ticker

6/recent/ticker-posts

भांडेवाडीत कौटुंबिक वादातून थरार; तरुणाचा चाकू भोसकून खून, दोघे गंभीर जखमी!



बुध दि . (प्रकाश राजेघाटगे):

 भांडेवाडी येथे कौटुंबिक वादातून झालेल्या सशस्त्र मारहाणीत एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच खून झाला असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील एक संशयित आरोपी अरबाज नंतास शिंदे याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोळ (ता. खटाव) येथील रहिवासी होश झाकीर काळे (वय १९) याचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वादातून दिवसाढवळ्या झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे खटाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

**कौटुंबिक वादातून थरार**

मोळ (ता. खटाव) येथील रहिवासी फिर्यादी अभय झाकीर काळे यांची चुलती प्रतिमा हिचा विवाह भांडेवाडी येथील अमर वरिस-या काळे याच्याशी झाला आहे. मात्र, प्रतिमा हिचे वडील किर्लोस्कर निरगेल शिंदे (रा. सिद्धेश्वर कुरोली) हे "तिने पतीसोबत नांदू नये आणि माहेरी यावे," या कारणावरून सतत भांडेवाडी येथे येऊन जावयाशी वाद घालत होते. प्रतिमा हिला चार मुले असून ती वडिलांचे न ऐकता पतीसोबतच राहत होती. याच कारणाचा जाब विचारण्यासाठी शनिवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास अभय काळे, त्यांचा भाऊ होश काळे व चुलत भाऊ अभिजीत काळे हे भांडेवाडी येथील गाडेबाबा मंदिरासमोर गेले होते.

**मंदिराजवळ गाठून जीवघेणा हल्ला**

मंदिरासमोर किर्लोस्कर शिंदे याला "तू आमच्या चुलतीला नीट नांदू का देत नाहीस?" असे विचारल्याचा राग मनात धरून किर्लोस्करने शिवीगाळ सुरू केली. त्याच वेळी त्याचा मुलगा साजन शिंदे आणि पुतणे अरबाज शिंदे व अक्षर शिंदे हे मारुती सुझुकी अल्टो गाडीतून (क्रमांक MH 05 AX 6093) तिथे हत्यारांसह आले. किर्लोस्करने "आज या तिघांना जिवंत सोडायचं नाही" असे चिथावल्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉड आणि चाकूने फिर्यादी अभय आणि त्यांच्या भावांवर हल्ला चढवला.

**एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी**

या झटापटीत मुख्य संशयित आरोपी अक्षर अतुल शिंदे याने साजनच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि "तुला आज संपवतोच" असे म्हणत होश झाकीर काळे (वय १९, रा. मोळ) याच्या छातीवर जोरदार वार केले. हा वार इतका भीषण होता की होश गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच हल्ल्यात फिर्यादी अभय काळे आणि चुलत भाऊ अभिजीत काळे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

**पोलिसांची तत्परता आणि कारवाई**

घटनेची माहिती मिळताच भांडेवाडी गावच्या पोलीस पाटील रोहिणी संदीप फडतरे यांनी तात्काळ पुसेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) एन. जे. खुने, पोलीस उपनिरीक्षक शेख आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, जेथे डॉक्टरांनी होश काळे याला मृत घोषित केले.

घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा ग्रामीण विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

**गुन्हा दाखल; एका आरोपीला बेड्या**

याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात किर्लोस्कर निरगेल शिंदे, साजन किर्लोस्कर शिंदे, अक्षर अतुल शिंदे आणि अरबाज नंतास शिंदे (सर्व रा. सिद्धेश्वर कुरोली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) (खून), १०९(१) (खुनाचा प्रयत्न) व इतर विविध कलमांखाली गुन्हा रजिस्टर क्रमांक ११४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील संशयित आरोपी अरबाज नंतास शिंदे (वय २३) याला पोलिसांनी तातडीने अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार आणि हत्यारे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि एन. जे. खुने करत आहेत.  छायाचित्र -.२) आरोपी -अटक - आरबाज शिंदे १  )होश झाकीर काळे -खून ( मृत्यू )