Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावच्या मुख्य रस्त्याची 'चाळण'

 


आश्वासनांचा पाऊस, पण कामाचा पत्ता नाही!

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा-टेंभुर्णी   राष्ट्रीय  महामार्ग  NH548C या मुख्य महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे केंद्र  असलेल्या पुसेगावमध्ये रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. विशेषत गावातील हनुमान मंदिर ते  श्री सेवागिरी मंदिर  या दरम्यानच्या रस्त्याने मृत्यूचा सापळा धारण केला असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

पुसेगाव हे केवळ एक व्यापारी केंद्र नसून,परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांचे  पावन समाधी स्थळ आहे. दररोज हजारो भाविक आणि वाहनांची येथे ये-जा असते. मात्र, हनुमान मंदिर ते  श्री सेवागिरी मंदिर   

 या पट्ट्यात रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हे ओळखणे कठीण 

झाले आहे.

 काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्यामुळे एका कारने पेट घेतल्याची गंभीर घटना घडली होती. सुदैवाने यात प्राणहानी टळली असली तरी, प्रशासनाला जाग येण्यासाठी आणखी किती मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

  गावात अनेक नामवंत शाळा आणि शैक्षणिक संस्था आहेत. सायकलवरून किंवा पायी जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावर  साठलेल्या  गटर  च    पाणी  आणि खड्डेयुक्त रस्त्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे 

 अनेक आंदोलन निष्फळ 

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुसेगावच्या ग्रामस्थांनी आतापर्यंत अनेकदा निवेदने दिली, धरणे आंदोलन, उपोषण, रस्ता रोको  पुसेगांव बंद अशा  विविध मार्गांनी आंदोलनेही केली. प्रत्येक वेळी प्रशासनाकडून आणि नेत्यांकडून "लवकरच काम सुरू होईल"अशी आश्वासने दिली जातात. मात्र, ही आश्वासने केवळ हवेत  वीरली असून प्रत्यक्षात कामाचा एक दगडही हललेला नाही.  येणाऱ्या पावसाळ्यात या रस्त्याच  ओढ्यात रूपांतर होणार आहे.

चौकट 

निवडणुका आल्या की नेते आश्वासनांची खैरात करतात, मात्र रस्ता रुंदीकरण  मूळ प्रश्नावर कोणीही ठोस कृती करत नाही . नुकसान   भरवाई  ची   तरतुद या  मेगा इंजिनियरिंग च्या प्रोजेक्ट मध्ये नाही  आणि नुकसान भरपाई द्यायला कोणी पुढ़े येत नाही. काही  राजकीय वरदहस्त असलेल्या लोकानी   रस्ता रुन्दीकरण च्या कामात अड़थळा आणल्यामुळे श्री सेवागिरी महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही या त्रासाचा सामना करावा लागत आहे हे पुसेगावचे दुर्दैव आहे."

 - धीरज जाधव   

पुसेगावमधील हा रस्ता केवळ दळणवळणाचा मार्ग नसून तो या भागाच्या विकासाची रक्तवाहिनी आहे. जर तातडीने या रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर येणाऱ्या काळात ग्रामस्थ अधिक तीव्र आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत. प्रशासनाने आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन या 'खड्डेमय' जाचातून पुसेगावची मुक्तता करावी, हीच माफक अपेक्षा.

छायाचित्र - पुसेगाव मधील मुख्य रस्त्याची झालेली चाळण. छाया - प्रकाश राजेघाटगे