Ticker

6/recent/ticker-posts

दिड महिन्यात ७९ खांबाच्या मुख्य लाईनमधील तारा चोरीला , महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान

 


  चोरटयांचे पुसेगाव पोलीसांनाच आवाहन , दुष्काळात तेरावा महिना , शेतकऱ्यांची अवस्था बिकट   

 बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ]

 खटाव तालुक्यातील बुध उपकेंद्राच्या अखरित्यात बुध व ललगुण परिसरात सुमारे दिड महिन्यात ८ वेळा चोरटयांनी चोरी करुन ७९ खांबांच्या मुख्य लाईनमधील अॅल्युमिनियमच्या  तारा चोरून ७९ हजार फुट तारांची चोरी करून महावितरणच्या लाखो रुपयांच्या तारावर डल्ला मारला आहे . प्रत्येकवेळी चोरट्यांनी चोरी करून पुसेगाव पोलीसांनाच आवाहन दिले आहे . प्रत्येकवेळी चोरी झाल्यानंतर रितसर तक्रार करूनसुध्दा आतापर्यंत एकही चोरी उघडकीस न आल्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे .विहीरीमध्ये पाणी असुन सुध्दा विज नसल्यामुळे भागायती पिके वाळून चालली आहेत .           याबाबत अधिक माहिती अशी , आत्तापर्यंत नेर तलाव, नदीकाठी विहीर  , शेतातल्या विहीरी वरील मोटारी , केबल यांच्या चोरी होत असत पण दिड महिन्यापासून चोरट्यांनी महावितरणच्या मेन खांबावरील अॅल्युमिनियमच्या तारांची चोरी करण्याचे सत्र सुरू आहे . पहिल्यांदा चोरटयांनी बुध येथील लालबाग शिवारातील पुंडकर डिपीवरील ११ खांबावरील अल्युमिनियमच्या तारांची चोरी करून शुभारंभ केला . त्यानंतर  थोडया दिवसांचा कालावधी जाऊन दिल्यानंतर काटेवाडी येथील कचरे डिपीवरील १४ पोलमधील तारांची चोरी केली .  बुध येथील मेन रोडवरील कळसे डिपीवरील ६ पोलच्या तारा चोरून नेहल्या . दुसऱ्याच दिवशी याच डिपीवरील पाच पोलच्या तारा चोरीस गेल्या . थोड्या दिवसानंतर याच डिपीवरील तेलक शिवारातील ११ पोलच्या तारांची चोरी  झाली .  यामुळे शेतक -यांमध्ये संताप उसळला . त्यामुळे चोरट्यांनी गाव बदली करून ललगुणच्या शिवाराकडे लक्ष केंद्रीत केले . ललगुण येथील खंडोबा माळ परिसरात गोवर्धन डिपीवरील पहिल्या दिवशी १२ तर दुसऱ्या दिवशी १० अशा २२ खांबावरील तारा चोरीस गेल्या .थोडया दिवसांनी याच डिपीवरील १० खांबावरील तारा चोरून नुसते पोल मोकळे करून ठेवले .

 काही ठिकाणी चोरट्यांनी वीज खांबही खाली पाडल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे . या चोरीमुळे परिसरातील शेती सिंचनाचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे .आधीच तीव्र उन्हाळा आणि पाण्याची टंचाई असताना आता वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे ऊस , आले यासारखी बारमाही पिके आणि फळबागा वाळू लागल्या आहेत . चारा पिके आणि आले पिक लागवडीसाठीही मोठया अडचणी निर्माण झाल्या आहेत .दरम्यान प्रशासन आणि महावितरण विभागाने तत्काळ दखल घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा तसेच चोरीच्या घटनांना आळा  घालण्यासाठी कठोर उपाययोजना करा०यात , अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे . विज तारा चोरीमुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही . ऊस , आले  , पेरू यांसारखी पिके वाळत चालली आहेत . प्रशासनाने तातडीने कारवाई करून वीजपुरवठा सुरळीत करावा आणि चोरटयांना कठोर शिक्षा द्यावी , अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे .                       युध्दजन्य परिस्थितीमुळे    अॅल्युमिनियम तारांच्या किमतीत वाढ झाली असून तारा मिळणे अशक्य  झाल्या आहेत . या तारा चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्पाचा संशय शेतकरी व्यक्त करत आहेत . सुमारे दिड महिन्यापासून वारंवार तारा चोरी    होत असून सुद्धा तारा चोर सापडत नसल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत . शेतातील वीज खांबावर २४ तास लक्ष ठेवणे शक्य नसल्यामुळे . चोरटयांना सहज संधी मिळते . पुसेगाव पोलीस ठाणे परिसरात वारंवार विद्युत मोटारी , तांब्याची केबळ  , सिंगल फेज स्टार्टर , अन् ट्रान्सफार्मर यांच्या घटनेत वाढ होत असूनही ताराचोर सापडत नसल्याने  शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .

 चौकट :  खांबावरील तारा चोरी वेळी   त्याठिकाणचा डिपी बंद करून चोरटे ट्रॅक्टरचा वापर करून तारा चोरून नेहत आहेत . या चोरीमध्ये त्या खांबावरील डिपी कुठे आहे , त्याचा सप्लाय बंद करून ठेवतात . म्हणजे यामध्ये कुणीतरी माहितीचा माणूस असल्याशिवाय हे होऊ शकत नाही . चोरी झाल्यानंतर सप्लाय पुन्हा सुरु करुन जातात . हे यातील विशेष आहे .

 चौकट : पुसेगाव पोलीस स्टेशनचा नुकताच पदभार स्विकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी यापूर्वी गुन्हा अन्वेषण विभागात दमदार कामगिरी केली आहे . त्यांना चोरट्यांना पकडून लगाम लावल्याचे अनुभव जास्त असल्यामुळे त्यांच्यावर शेतकऱ्यांची मोठी भिस्त आहे . त्यामुळे ते या चोरीकडे किती गांभीर्याने बघतात यावरचं सर्व काही अवलंबून आहे .