*संभाजी मुळक याची मुंबई पोलीसपदी निवड ; ग्रामस्थांकडून सत्कार*.
प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
तालुक्यातील सुशी (व) येथील भूमिपुत्र संभाजी शिवाजी मुळक याची नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. विशेष म्हणजे तो गावातील पहिला पोलीस म्हणून पोलीस दलात भरती झाला आहे. तर शेतकऱ्याचा मुलगा पोलीस झाल्याने सुशी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा भव्य नागरी सत्कार करुन गावातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. एका ग्रामीण भागातील तरुणाने आपल्या कष्टाच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
विनोद पौंळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी कुटुंबातील संभाजी शिवाजी मुळक याने यापूर्वी आर्मी , वनरक्षक, पोलीस भरती यांसह विविध खात्यात भरतीसाठी प्रयत्न केले. परंतु शेवटी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर त्याने यशाला गवसणी घातली आहे. ना कोणत्या अकॅडमीत ना कुठले क्लास त्याने केले होते. फक्त मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सुशी ग्रामस्थांच्या वतीने त्याची गावातून भव्य मिरवणूक काढली. यावेळी महिलांनी त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करुन गावातील मुख्य चौकातून फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच युवक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी होवून आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे आहे
लहानपणापासून मनात एकच स्वप्न होते की सर्वसामान्याची सेवा करण्यासाठी आपल्याला मोठा अधिकारी व्हायचं आहे. आई-वडील आणि शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाने पोलीस दलात भरती झालो आहे. एवढ्यावरच न थांबता पोलीस खात्यातून सर्वसामान्याची सेवा करत भविष्यात पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी होवून आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे आहे.- संभाजी शिवाजी मुळक (पोलीस)
महागड्या क्लासेसशिवाय जिद्दीने परिश्रमातून मिळवले यश; तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत
महागडे क्लासेस किंवा अभ्यासिकेंशिवाय केवळ स्वयंभू जिद्द आणि परिश्रमातून पोलीस बनणे हे प्रेरणादायी आहे. हा प्रवास कठोर मेहनत, नियोजनात्मक अभ्यास आणि सातत्यपूर्ण मैदानी सरावाचा उत्तम मेळ असतो. संभाजी शिवाजी मुळक याने प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असतानाही जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी पोलीस भरतीमध्ये यश संपादन केले. त्यांच्या या निवडीबद्दल गावातील इतर तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत बनला आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत..





Social Plugin