बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
रेवलकरवाडी ता. खटाव जि. सातारा येथील ग्रामदैवत श्री आई काळूबाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे. दि. २६ एप्रिल २०२६ रोजी मंदिरात गोंधळाच्या कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात झाली. रात्री १२ वाजता श्री काळूबाई देवीची आरती करून पारंपरिक पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
पालखीच्या पाठीमागे गावातील चार आळ्यांच्या चार बैलगाड्या पारंपरिक पद्धतीने सहभागी झाल्या. या गाड्यांमध्ये विविध देव-देवतांची रूपे धारण केलेल्या बालकांचे सोंग बसविण्यात आले होते. ढोल-ताशे , लेझीम, हलगी व बँडच्या तालावर निनादात पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या पारंपरिक सोहळ्यानेसर्व ग्रामस्थांसह भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांपासून ग्रामस्थांनी डॉल्बी सिस्टीमवर बंदी घातली असून, यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या सहकार्याने नियमांचे पालन करत यात्रेचा मुख्य दिवस शांततेत आणि सुरळीत पार पडला.
दि. २७ एप्रिल सोमवारी सकाळी गावच्या मुख्य चौकातील मारुती मंदिरासमोर तमाशातील गण, गवळण व बतावणी कार्यक्रम पार पडला. दुपारी नामांकित तमाशा, सायंकाळी जंगी कुस्ती स्पर्धेचा फड, तसेच रात्री ९ वाजता उत्कृष्ट ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्या दि. २८ एप्रिल रोजी गावातील तरुण मंडळाकडून नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्री काळूबाई देवीच्या यात्रेत मटण, कोंबडी किंवा बोकड बळीची कोणतीही प्रथा नाही. गावच्या नियमांमध्ये कोणी बदल करण्याचा प्रयत्न केल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे आजपर्यंत गावात ना भांडणे, ना डॉल्बी, कोणत्याही प्रकारच्या अशांततेला थारा मिळाला नाही.
यात्रेतील सर्व कार्यक्रम लोकवर्गणी व देणगीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येतात. यात्रेनिमित्त गावच्या मुख्य चौकात विविध खेळणी, खाद्यपदार्थांची दुकानेही सजली असून यात्रेला जत्रेचे रूप आले आहे.
छोटेसे गाव, पण सुंदर नियोजन, शिस्तबद्ध परंपरा आणि भक्तिभाव यामुळे रेवलककरवाडीची श्री काळूबाई देवी यात्रा पंचक्रोशीत आणि परिसरात आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.





Social Plugin