Ticker

6/recent/ticker-posts

ऐसे कैसे झाले भोंदू’ नाटकातून अंधश्रद्धाविरोधी प्रभावी प्रबोधन

 


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, बुध यांच्या वतीने ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ हे विनोदी आणि अंधश्रद्धा निर्मूलनपर प्रबोधन करणारे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाच्या माध्यमातून समाजातील भोंदूगिरी आणि अंधश्रद्धा यावर प्रहार करत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), कोल्हापूरच्या कलाकारांनी हे नाटक सादर केले. नाटकात भोंदू बुवांच्या तथाकथित ‘चमत्कारां’मागील सत्य उलगडण्यात आले. हवेतून वस्तू काढणे, डोळे बंद करून वस्तू ओळखणे, हाताच्या बोटावर प्रश्नचिन्ह तोलणे, जीभेतून टोकदार सळई आरपार करणे, पेटता कापूर खाणे अशा करामती प्रत्यक्ष करून दाखवत त्या मागील खरे विज्ञान, हातचलाखी आणि मानसशास्त्रीय फसवणूक यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे प्रेक्षकांना या भोंदूगिरीचे वास्तव समजून घेण्यास मदत झाली.

कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर खराते, कार्याध्यक्ष सुरेश खराते, राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे (कोल्हापूर), कपिल मुळे, संघसेन जगतकर, स्वाती कृष्णात, निशांत सुनंदा विश्वास, मुक्ता निशांत, यांची उपस्थिती होती.

यावेळी राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी मार्गदर्शन करताना समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात सजग राहून विचारपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे विचार आणि त्यांनी सुरू केलेले संघटनात्मक कार्य पुढे नेणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विनोदी शैलीत सादर केलेल्या या नाटकाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतानाच अंधश्रद्धाविरोधी विचारांची बीजे रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.