प्रशासनाने लक्ष देण्याची अध्यक्ष निखिल नलवडे यांची मागणी
संकल्प फाउंडेशनतर्फे दुधगांव येथील वारणा नदीमध्ये वाढलेल्या जलपर्णी काढून नदी स्वच्छतेची मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या उपक्रमात संस्थेचे स्वयंसेवक, स्थानिक ग्रामस्थ व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडथळित होत असून प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन संकल्प फाउंडेशनने पुढाकार घेत नदी पात्र स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले. मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात जलपर्णी काढण्यात आली असून त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष निखिल नलवडे यांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. नदी स्वच्छतेसाठी केवळ स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवाव्यात, जलपर्णी नियंत्रणासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी तसेच जनजागृती वाढवावी, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी उपाध्यक्ष रोहित शिपुगडे, संचालक प्रमोद शिपुगडे, सुधीर राणगे, अक्षय नलवडे, ओंकार शिपुगडे, अन्वित मोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून प्रशासन, संस्था व नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून वारणा नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.





Social Plugin