Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार भाऊसाहेब मुके पाटील यांना 'मराठवाडा समर्थ गुणवंत पत्रकार गौरव पुरस्कार' प्रदान



   


परतूर (प्रतिनिधी)

    पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाची दखल घेत, पत्रकार श्री. भाऊसाहेब कुशिवृत्ता देविदासराव मुके पाटील यांना मानाच्या 'मराठवाडा समर्थ गुणवंत पत्रकार गौरव पुरस्कारा'ने १ मे रोजी सन्मानित करण्यात आले. समर्थ सेवा समूह मित्र मंडळ आणि संतकृपा सेवा प्रतिष्ठान, छ. संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

आपल्या निर्भीड आणि निष्पक्ष लेखणीद्वारे सातत्याने समाजहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या श्री. मुके पाटील यांच्या कार्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजात निर्माण केलेली विश्वासार्हता आणि जनसामान्यांच्या समस्यांना मिळवून दिलेली प्रभावी प्रसिद्धी यामुळे त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ गुणवंत कामगार शाहीर लक्ष्मणराव मोकसरे, डॉ. सुभाष नाईकनवरे, दैनिक पुढारीचे संपादक तुकारामजी शिंदे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद नाना आर्दड आणि सोहळ्याचे संयोजक डॉ. दत्तात्रय ठुबे पाटोदकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते श्री. मुके पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी दत्तात्रय ठुबे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये समर्थ सेवा समूह मित्र मंडळ आणि संतकृपा सेवा प्रतिष्ठान हे मागील १५ वर्षांपासून कोणत्याही अपेक्षेविना जण सामान्य जनतेसाठी कार्य करणाऱ्या समाजातील संत, महंत, शेतकरी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच विविध घटकांमधील हिरे शोधून आम्ही हे पुरस्कार देत असतो. यंदा हे पुरस्कार वितरणाचे १६ वे वर्ष आहे असे सांगितले.

परिवाराचा सहभाग आणि आनंद

हा पुरस्कार स्वीकारताना श्री. भाऊसाहेब मुके पाटील यांनी आपला आनंद व्यक्त केला. हे यश केवळ माझे नसून माझ्या परिवाराचे आणि माझ्या लेखणीवर विश्वास ठेवणाऱ्या वाचकांचे आहे, असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मुके पाटील हे आपल्या परिवारासह उपस्थित होते. 

त्यांच्या या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल परतूर परिसरातील नागरिक, सहकारी पत्रकार, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्नेहीजनांकडून तसेच व्हाईस ऑफ मीडिया परतुर यांच्याकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.