*कुर्बानी शुक्रवारी*
बुध दि (प्रकाश राजेघाटगे )
श्री क्षेत्र पुसेगाव हे श्री सेवागिरी महाराजांचे पवित्र शक्तीपीठ असून, येथे महाराजांची संजीवन समाधी आहे. या पावन नगरीला खूप मोठे आध्यात्मिक महत्त्व लाभले आहे. साधुसंतांनी समाजाला नेहमीच शांतता, संयम आणि सन्मार्गाची दिशा दाखवली आहे. याच आध्यात्मिक मार्गावर चालत असताना हिंदू धर्मात आणि संतांच्या शिकवणीत प्राणिमात्रांवर दया करण्याचे आणि अहिंसेचे महत्त्व सांगितले गेले आहे. त्यातच, पुसेगावमध्ये गुरुवार हा श्री सेवागिरी महाराजांचा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दिवस मानला जातो. या दिवशी संपूर्ण गावात मांस विक्री आणि सेवनास पूर्णपणे बंदी असते.
याच पार्श्वभूमीवर, काल गुरुवारी आलेल्या बकरी ईदच्या सणादिवशी पुसेगाव येथील तमाम मुस्लिम बांधवांनी एकतेचे आणि समंजसपणाचे अनोखे उदाहरण सादर केले. इतर धर्मीयांच्या भावनांचा आणि गावाच्या आध्यात्मिक परंपरेचा आदर राखून, मुस्लिम समाजाने गुरुवारी पवित्र 'कुर्बानी' न देता अत्यंत शांततेत आणि उत्साहात बकरी ईद साजरी केली. व गुरुवारी कुर्बानी न घेता शुक्रवारी घेण्यात आल्या.गावाचे आध्यात्मिक महत्त्व आणि पवित्रता कायम राखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी घेतलेली ही सहकार्याची भूमिका अत्यंत कौतुकास्पद आणि मार्गदर्शक ठरली आहे.
चौकट
पुसेगावातील मुस्लिम बांधवांनी या निर्णयाद्वारे संपूर्ण समाजात शांतता, बंधुभाव आणि धार्मिक सलोख्याचा एक अत्यंत सुंदर संदेश दिला आहे. अशाच प्रकारे गावामध्ये कायम जातीय सलोखा टिकवून, एकमेकांच्या धर्माचा आणि भावनांचा सन्मान राखल्यास सर्वच धर्मांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि गावच्या शांततेसाठी हा ऐतिहासिक निर्णय एक मैलाचा दगड ठरेल, यात तीळमात्र शंका नाही. मुस्लिम बांधवांच्या या संवेदनशील आणि सुजाण भूमिकेचे संपूर्ण परिसरातून जोरदार स्वागत आणि कौतुक होत आहे.
पुसेगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राम जाधव व ग्रामस्थ पुसेगाव





Social Plugin