Ticker

6/recent/ticker-posts

“वाढवण बंदराच्या नावाखाली जीवाशी खेळ! ओव्हरलोड डंपरवर पोलिसांची धडक कारवाई”



०७ मे २०२६

पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर 

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हा देशातील सर्वात मोठ्या प्रस्तावित खोल समुद्री बंदर प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) यांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जात असून, देशाच्या व्यापार क्षमतेत वाढ होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मात्र, या प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या धोकादायक दगड वाहतुकीचा प्रकार समोर आला आहे. वांनगाव येथे मोठ्या प्रमाणात दगड साठवला जात असून हे दगड मनोर, वाडा आणि विक्रमगड येथून मोठमोठ्या डंपरमधून आणले जात आहेत.

या डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त दगड भरून वाहतूक केली जात असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तारापूर रोड, बोईसर येथील TAPS गेट समोर ही जीवघेणी वाहतूक सुरू असताना तारापूर पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक निवास कणसे यांनी धडक कारवाई करत सर्व ओव्हरलोड डंपर ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये जमा केले.

दरम्यान, दररोज शेकडो ओव्हरलोड डंपर रस्त्यावर धावत असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या मार्गावर वाहतूक करताना शाळकरी मुले, कामगार आणि सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे.

या कारवाईमुळे बेकायदेशीर वाहतुकीवर तात्पुरता आळा बसला असला तरी प्रश्न कायम आहे —

“वाढवण बंदराच्या नावाखाली हा जीवघेणा प्रकार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?”

“नियम धाब्यावर बसवून सुरू असलेला हा प्रकार थांबवणार कोण?”

स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Displaying